
सध्या अनेक देशांमध्ये ‘पॉड कार’ प्रणाली (Pod Car System) लोकप्रिय ठरत आहे. ही एक स्वयंचलित, चालकविरहित वाहतूक प्रणाली आहे. यामध्ये लहान इलेक्ट्रिक वाहने विशेषतः बांधलेल्या मार्गांवर धावतात, ज्यामुळे प्रवाशांना त्यांच्या मागणीनुसार थेट, थांबारहित प्रवासाची सुविधा मिळते. ही वाहने सामान्यतः 4 ते 6 प्रवाशांना एकावेळी वाहून नेऊ शकतात. आता वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सनंतर, महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मीरा-भाईंदर प्रदेशात नाविन्यपूर्ण ड्रायव्हरलेस पॉड कार वाहतूक व्यवस्था सुरू करण्याचा मानस आहे. सोमवारी वडोदरा येथे सरनाईक यांनी भारताच्या 'मेक इन इंडिया' उपक्रमाचा भाग म्हणून विकसित करण्यात येत असलेल्या पॉड कार चाचणी आणि प्रयोग केंद्राला भेट दिली.
यावेळी गुजरातमधील वडोदरा शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी भविष्यात ‘उन्नत पॉडकार’ वाहतूक सेवा ही महत्त्वाची भूमिका पार पडेल. ही निश्चितच नावीन्यपूर्ण वाहतूक व्यवस्था ठरणार आहे, असा विश्वास सरनाईक यांनी व्यक्त केला. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या उन्नत पॉडकार वाहतूक व्यवस्था पाहणी करण्यासाठी, तसेच अशा प्रकारची वाहतूक व्यवस्था महाराष्ट्रातील लोकसंख्येची दाट घनता असलेल्या शहरात वापर करण्याची चाचपणी करण्याच्या उद्देशाने मंत्री सरनाईक यांनी या प्रकल्पाला भेट दिली.
नुट्रान ईव्ही मोबिलिटी या कंपनीने फुट्रान प्रणालीवर आधारित उन्नत पॉडकार वाहतूक व्यवस्था विकसित केली आहे. या ठिकाणी स्वयंचलित पॉडकार्स उन्नत ट्रॅकवर जोडल्या जातात. रस्ते वाहतुकीला अडचण न ठरता त्या कार्यरत राहतात. एका पॉडकारमध्ये किमान 20 प्रवासी बसू शकतात व 60 ते 70 किमी प्रति तास या वेगाने या पॉड कार प्रवास करतात. ऑन बोर्ड इलेक्ट्रिक मोटर आणि बॅटरी सिस्टमवर या कार्यरत राहतात. विशेष म्हणजे शहरी रस्त्यावरील कमीत कमी जागेचा वापर करून दाट लोकसंख्येच्या भागात देखील त्या उपयुक्त ठरू शकतात. (हेही वाचा: Pune Shivajinagar To Hinjawadi Metro: पुणेकरांसाठी खुशखबर! शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो प्रकल्पाचे काम 82 टक्के पूर्ण, लवकरच होणार ट्रायल आणि ऑक्टोबर 2025 पर्यंत सेवा सुरू)
सरनाईक यांनी ही उन्नत पॉडकार वाहतूक यंत्रणा महाराष्ट्रातील मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रामध्ये सुरुवातीला चालविण्याबाबत सकारात्मकता दाखवली असून, भविष्यात देशातील पहिला प्रयोग म्हणून मीरा-भाईंदर येथे ‘उन्नत पॉडकार’ वाहतूक यंत्रणेचा समावेश होईल, असेही त्यांनी सांगितले. सरनाईक म्हणाले, वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स व्यवसाय जिल्हा त्याच्या पॉड कार सिस्टीमसह आधीच प्रगती करत आहे, ज्याला माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली होती. आता मुंबई महानगर प्रदेशच्या दुसऱ्या पॉड कार प्रकल्पाला लवकरच मीरा-भाईंदर आणि आसपासच्या भागांसाठी परवानगी दिली जाईल, ज्यामुळे शहरी गतिशीलता मोठ्या प्रमाणात सुधारेल आणि दैनंदिन प्रवाशांसाठी एक कार्यक्षम, आधुनिक वाहतुकीचे साधन उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे.
दरम्यान, पॉड कार्स पूर्णपणे स्वयंचलित आणि चालकविरहित असतात, ज्यामुळे मानवी त्रुटींची शक्यता कमी होते आणि प्रवास अधिक सुरक्षित होतो. प्रवासी त्यांच्या सोयीनुसार पॉड कार्स बोलावू शकतात, ज्यामुळे थांब्यांवर थांबण्याची गरज नाही आणि प्रवासाचा वेळ कमी होतो. ही वाहने इलेक्ट्रिकवर चालत असल्यामुळे प्रदूषण कमी होते आणि पर्यावरणास अनुकूल आहेत.