Gay Imam Muhsin Hendricks

Gay Imam Muhsin Hendricks Shot Dead: दक्षिण आफ्रिकेतील इमाम मुहसिन हेंड्रिक्स (Imam Muhsin Hendricks) यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. मुहसिन हेंड्रिक्स हे समलैंगिक (Gay) होते आणि खुलेपणाने त्यांनी आपल्या लैंगिकतेबाबत भाष्य केले होते. महत्वाचे म्हणजे उघडपणे समलैंगिक म्हणून जीवन जगणारे ते जगातील पहिले इमाम होते. द गार्डियनच्या वृत्तानुसार, शनिवारी दक्षिणेकडील गकेबारा शहराजवळ इमाम मुहसिन हेन्ड्रिक्स यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी सांगितले की, मृत इमाम उपेक्षित मुस्लिम आणि इतर समलैंगिकांसाठी सुरक्षित आश्रयस्थान म्हणून मशीद चालवत होते. इमाम मोहसीन हेन्ड्रिक्स त्यांच्या सहकाऱ्यासह (ड्रायव्हर) गाडीतून कुठेतरी जात होते, तेव्हा एक गाडी त्यांच्यासमोर येऊन थांबली आणि त्यांचा बाहेर पडण्याचा मार्ग अडवला.

चेहरे झाकलेले दोन अज्ञात संशयित वाहनातून उतरले आणि त्यांनी इमामच्या वाहनावर गोळीबार केला. त्यानंतर हल्लेखोर घटनास्थळावरून पळून गेले. यामध्ये हेन्ड्रिक्स जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. ही हत्या पूर्वी पोर्ट एलिझाबेथ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गकेबाराजवळील बेथेल्सडॉर्पमध्ये झाली. हत्येचा हेतू अज्ञात आहे आणि तो तपासाचा भाग आहे, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेबद्दल माहिती असलेल्या कोणालाही पुढे येण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

आंतरराष्ट्रीय लेस्बियन, गे, बायसेक्शुअल, ट्रान्स आणि इंटरसेक्स असोसिएशनने या हत्येचा निषेध केला. मोहसिन हेंड्रिक्स हे दक्षिण आफ्रिकेतील एक इस्लामी विद्वान, इमाम आणि एलजीबीटीक्यू+ अधिकार कार्यकर्ते होते. त्यांचा जन्म जून 1967 मध्ये केप टाउन येथे झाला. त्यांनी कराची, पाकिस्तान येथील इस्लामिक विद्यापीठातून अरबी आणि इस्लामी न्यायशास्त्राचे अध्ययन केले. 1996 मध्ये, त्यांनी स्वतःच्या समलैंगिकतेबद्दल उघडपणे जाहीर भाष्य केले. त्याच्या कबुलीजबाबामुळे इस्लामिक जगात खळबळ उडाली. त्यामुळे त्यांना बरीच टीका सहन करावी लागली. (हेही वाचा: Errol Musk's Shocking Claim: 'बराक ओबामा ‘समलैंगिक’ असून त्यांनी स्त्रीसारखे कपडे घालणाऱ्या पुरुषाशी लग्न केले'; एलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क यांचा धक्कादायक दावा)

सर्व टीकेच्या पार्श्वभूमीवर, त्यांनी LGBTQ आणि मुस्लिमांच्या हक्कांसाठी वकिली करण्यास सुरुवात केली. हेंड्रिक्स यांनी केप टाउनमध्ये एलजीबीटीक्यू+ मुस्लिमांसाठी सुरक्षित उपासनेचे ठिकाण म्हणून जगातील पहिली समलैंगिक-अनुकूल मशिद स्थापन केली. या उपक्रमाद्वारे, त्यांनी पारंपारिक धार्मिक नेत्यांच्या निषेधाच्या पार्श्वभूमीवर, समलैंगिक मुस्लिमांना उपासनेची आणि समुदायाची जागा प्रदान केली. हेन्ड्रिक्स यांनी एका माहितीपटात त्यांच्याविरुद्ध धमक्यांचे संकेत दिले होते, परंतु 'मृत्यूच्या भीतीपेक्षा प्रामाणिक असण्याची गरज मोठी आहे' असा आग्रह त्यांनी धरला व आपले कार्य करत राहिले.