
जगातील सर्वात मौल्यवान कार कंपनी टेस्ला (Tesla) भारतात प्रवेश करणार आहे. एलोन मस्क यांनी नुकतीच अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. तेव्हापासून, त्यांच्या टेस्ला आणि स्टारलिंक या कंपन्या भारतात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. टेस्ला आणि भारत यांच्यातील संबंध बरेच चढ-उताराचे राहिले आहेत. जास्त दरांमुळे टेस्ला भारतात येण्यास घाबरत होती. सरकारने आता 40,000 डॉलर्सपेक्षा जास्त किमतीच्या वाहनांवरील मूळ सीमाशुल्क 110% वरून 70% पर्यंत कमी केले आहे. त्यामुळे टेस्लासाठी भारतामध्ये येण्याची ही एक उत्तम संधी आहे. चीनच्या तुलनेत, भारतातील ईव्ही कार बाजारपेठ अजूनही त्याच्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. गेल्या वर्षी भारतात सुमारे 1 लाख ईव्ही विकल्या गेल्या, तर चीनमध्ये ही संख्या 1.1 कोटी होती.
टेस्ला भारतामध्ये करत आहे 13 पदांसाठी नोकरभरती-
टेस्लाने आता भारतात कर्मचाऱ्यांची भरती करण्यासाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. यावरून असे दिसून येते की, कंपनी भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याची तयारी करत आहे. सोमवारी, टेस्लाने त्यांच्या लिंक्डइन पेजवर 13 पदांसाठी अर्ज मागवले. यामध्ये ग्राहकांशी संवाद साधण्याच्या आणि बॅक-एंड भूमिकांचा समावेश होता. एकूण पदांपैकी, किमान पाच पदे, जसे की सेवा तंत्रज्ञ आणि विविध सल्लागार भूमिका, मुंबई आणि दिल्ली दोन्ही ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच वेळी, कस्टमर एंगेजमेंट मॅनेजर आणि डिलिव्हरी ऑपरेशन्स स्पेशालिस्ट सारख्या नोकऱ्या विशेषतः मुंबईसाठी सूचीबद्ध आहेत.
पीएम मोदी-मस्क यांची भेट-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या अलिकडच्या अमेरिका दौऱ्यादरम्यान टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांची भेट घेतली. या बैठकीत त्यांनी अंतराळ संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, शाश्वत विकास, उद्योजकता आणि चांगले प्रशासन यांसारख्या विविध विषयांवर चर्चा केली. डोनाल्ड ट्रम्प प्रशासनात एलोन मस्क यांची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र ते खाजगी कंपन्यांचे सीईओ म्हणून मोदींना भेटले होते की इतर कोणत्याही भूमिकेत हे स्पष्ट नाही. पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील बैठकीनंतर ट्रम्प यांनी खुलासा केला की, भारतीय पंतप्रधानांनी अमेरिकेची व्यापार तूट कमी करण्यावर आणि लष्करी खरेदी वाढवण्यावर चर्चा केली. (हेही वाचा: New Honda NX200 Launched in India: होंडाने नवीन इंजिन आणि दमदार फीचर्ससह भारतात लाँच केली नवीन एनएक्एस 200 बाईक; जाणून घ्या किंमत व काय आहे खास)
दरम्यान, भारताला आपली अर्थव्यवस्था कार्बनमुक्त करायची आहे आणि 2027 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनाचे ध्येय साध्य करायचे आहे. यासोबतच देशातील श्रीमंत लोकांची संख्याही वाढत आहे. त्यामुळे, भारत इलेक्ट्रिक वाहनांसाठी एक मोठी बाजारपेठ बनत आहे. भारतात मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी टेस्ला अनेक वर्षांपासून टॅरिफ कपातीची मागणी करत आहे. carwale.com नुसार, भारतात टेस्ला मॉडेल एस ची अंदाजे किंमत 70 लाख रुपये असू शकते आणि ती पुढील वर्षी जानेवारीमध्ये लाँच केली जाऊ शकते.