![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2023/02/4.jpg?width=380&height=214)
US Mass Layoffs: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) आणि त्यांचे सल्लागार DOGE प्रमुख एलोन मस्क (Elon Musk) यांनी मिळून संघीय कर्मचारी म्हणजेच सरकारी कर्मचारी कमी करण्याची तयारी केली आहे. अमेरिकेतील सरकार 9,500 हून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा विचार करत आहे. रॉयटर्सच्या वृत्तानुसार, या कर्मचाऱ्यांमध्ये सरकारी जमिनींची काळजी घेणारे आणि माजी सैनिकांना आवश्यक सेवा पुरवणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
या क्षेत्रांवर होणार टाळेबंदीचा परिणाम -
या कपातीमुळे गृह, ऊर्जा, कृषी आणि आरोग्य आणि मानव सेवा यासह अनेक विभाग प्रभावित होणार आहेत. या निर्णयामुळे अनेक अनुभवी कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकऱ्या गमवाव्या लागणार आहेत. व्हाईट हाऊस आणि ऑफिस ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट (OPM) कडून किती कर्मचाऱ्यांना काढून टाकले जाणार आहे याची नेमकी संख्या अद्याप उघड झालेली नाही, परंतु रॉयटर्सचा दावा आहे की ट्रम्प प्रशासन अनेक विभागांमधील 9 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. (हेही वाचा - Meta Mass Layoffs: मेटाने घेतला मोठा निर्णय, पुढील आठवड्यात 3 हजार हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार)
मंगळवारी रात्रीपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याच्या सूचना देण्याचे निर्देश विभागांना देण्यात आले होते, ज्यामुळे आणखी नोकऱ्या कपातीची चिंता निर्माण झाली आहे. मंगळवारी, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी विभाग प्रमुखांना संघीय कर्मचाऱ्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात कपात करण्याची तयारी करण्याचे निर्देश देणारा कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली. यानंतर, 75 हजार कर्मचाऱ्यांनी त्यांच्या पद सोडण्याच्या ऑफर स्वीकारल्या. (हेही वाचा - Infosys Layoffs: इन्फोसिसने 300 हून अधिक फ्रेशर्सना कामावरून काढून टाकले; तब्बल अडीच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळाली होती नोकरी)
राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांची कपात करण्यामागील कारणही सांगितले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, अमेरिकन सरकार खूप कर्जात बुडाले आहे. गेल्या वर्षी 1.8 ट्रिलियन डॉलर्सची तूट यासह, जवळपास 36 ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज आहे. यावर मात करण्यासाठी ट्रम्प प्रशासनाने कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, काँग्रेसनल डेमोक्रॅट्सनी कर्मचाऱ्यांच्या कपातीला बेकायदेशीर म्हटले आहे. 'डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफिशियन्सी' (DOGE) चे सह-अध्यक्ष एलोन मस्क यांच्या निर्णयांची अंमलबजावणी केल्याचा आरोप ट्रम्प सरकारवर करण्यात आला आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्रीपासून वेटरन्स अफेयर्स विभागाने दोन वर्षांपेक्षा कमी सेवा असलेल्या लोकांसाठी 10 हजार हून अधिक नोकऱ्या कपातीची घोषणा केली. नागरी सेवा संरक्षण नसलेल्या सुरुवातीच्या नियुक्त्यांना लक्ष्य केल्यामुळे मिशिगन ते फ्लोरिडा पर्यंतच्या कार्यालयांमध्ये गोंधळ उडाला आहे. काही कर्मचाऱ्यांनी राजीनामा स्वीकारला असला तरी त्यांना कामावरून काढून टाकण्याच्या सूचना मिळाल्या आहेत.