टेक कंपनी इन्फोसिससोबत (Infosys) वादांची मालिका सुरूच आहे. याआधी कंपनीचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून 90 तास काम करावे, असे वक्तव्य करत उद्योग जगतात खळबळ उडवून दिली आणि आता कंपनीने आपल्या मैसूर प्रशिक्षण केंद्रातील सुमारे 350 ते 700 फ्रेशर्स कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले आहे. या कर्मचाऱ्यांना ऑक्टोबर 2024 मध्ये नियुक्त करण्यात आले होते. कंपनीच्या अंतर्गत मूल्यांकन चाचण्यांमध्ये तीन वेळा अपयशी ठरल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. सूत्रांनी सांगितले की, जावा प्रोग्रामिंग आणि डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम (DBMS) मधील त्यांची प्रवीणता आणि कौशल्ये तपासण्यासाठी हे मूल्यांकन करण्यात आले होते, ज्यासाठी त्यांना प्रत्येक मूल्यांकनात किमान 65% गुण मिळवणे आवश्यक होते.
इन्फोसिसच्या मते, सर्व नवोदितांना मैसूर केंद्रात विस्तृत प्रशिक्षणानंतर अंतर्गत मूल्यांकन चाचण्या पार कराव्या लागतात. तीन प्रयत्नांनंतरही चाचणी उत्तीर्ण न झाल्यास, करारानुसार, त्यांना कंपनीत पुढे काम करण्याची संधी दिली जात नाही. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही प्रक्रिया गेल्या दोन दशकांपासून अस्तित्वात आहे. या मूल्यांकन चाचणीमध्ये अपयशी ठरल्याने फ्रेशर्सना कंपनीमधून काढून टाकण्यात आले आहे. (हेही वाचा: Microsoft Layoffs: कमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टने दिला नारळ)
मात्र, तथापि, नासेंट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी एम्प्लॉईज सेनेट (NITES) या संघटनेने या प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे. त्यांच्या मते, कर्मचाऱ्यांना अचानक बोलावून, त्यांना ‘म्युच्युअल सेपरेशन’ पत्रांवर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले गेले. तसेच, या प्रक्रियेदरम्यान सुरक्षा रक्षकांची उपस्थिती होती, ज्यामुळे कर्मचाऱ्यांना असुरक्षित वाटले. NITES ने या प्रकरणी कामगार मंत्रालयाकडे तक्रार दाखल करण्याची योजना आखली आहे, ज्यामध्ये त्यांनी कंपनीच्या या वागणुकीवर आक्षेप घेतला आहे.
दुसरीकडे, सुमारे अडीच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आपल्याला कंपनीत ही संधी मिळाल्याचे अभियंते सांगतात. मंदीचे कारण देत कंपनीने प्रकल्प थांबवला होता. आता जेव्हा त्यांना कंपनीत परत येण्याची संधी मिळाली, तेव्हा कंपनीने त्यांना मुल्यांकन चाचणीमध्ये अपयशी घोषित करून काढून टाकले. या सर्वांना सिस्टम इंजिनिअर्स (SE) आणि डिजिटल स्पेशलिस्ट इंजिनिअर्स (DSE) या पदांसाठी भरती करून घेण्यात आले होते.