Layoffs (फोटो सौजन्य - Pixabay)

IBM Employee Layoffs 2025: टेक कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांच्या कपातीचा ट्रेंड थांबता थांबत नसल्याचं दिसत आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या कंपनीकडून कर्मचाऱ्यांना काढून टाकल्याच्या बातम्या येत असतात, मग ते खर्च कमी करण्यासाठी असो किंवा कंपनीच्या पुनर्रचनेचा भाग म्हणून असो. आता आणखी एक मोठी बातमी आली आहे की, अमेरिकन टेक दिग्गज आयबीएम देखील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी करत आहे. आयबीएम (International Business Machines Corporation) ला अनेकदा 'बिग ब्लू' असेही संबोधले जाते. ही आर्मोंक, न्यू यॉर्क येथे स्थित एक बहुराष्ट्रीय तंत्रज्ञान कंपनी आहे, जी 170 हून अधिक देशांमध्ये तिच्या सेवा पुरवते.

आयबीएम हजारो कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात -

आयबीएम लवकरच अमेरिकेतील हजारो कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू शकते. द रजिस्टरच्या एका वृत्तानुसार, आयबीएमच्या अंतर्गत सूत्रांचा असा विश्वास आहे की कंपनी त्यांच्या क्लाउड क्लासिक ऑपरेशनमधून मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. अहवालात असा दावा करण्यात आला आहे की आयबीएम हजारो कर्मचाऱ्यांना नारळ देण्याची योजना आखत आहे. कंपनी नेमका आकडा गुप्त ठेवत आहे, परंतु तो हजारोंमध्ये असू शकतो, असे द रजिस्टरने एका सूत्राच्या हवाल्याने म्हटले आहे. तथापि, आयबीएमने अद्याप या विषयावर कोणतेही अधिकृत विधान केलेले नाही. (हेही वाचा -US Mass Layoffs: अमेरिकेत मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात; सरकार 9 हजारहून अधिक लोकांना कामावरून काढण्याच्या तयारीत)

आयबीएम टाळेबंदी -

अहवालानुसार, आयबीएम यावेळी सुमारे 9 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकू शकते. तथापि, हे स्पष्ट नाही की ही कपातीची एक वेगळी फेरी असेल की जुन्या उत्पादनांशी संबंधित कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याच्या प्रक्रियेचा भाग असेल. अहवालात असेही म्हटले आहे की रॅले, नॉर्थ कॅरोलिना, न्यू यॉर्क शहर आणि राज्य, डलास, टेक्सास आणि कॅलिफोर्निया येथील आयबीएम कर्मचाऱ्यांना आधीच कामावरून काढून टाकण्यात आले आहे.