
भारतामधील आघाडीची ऑनलाइन फूड डिलिव्हरी कंपनी झोमॅटोने (Zomato) आपल्या 600 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. ही कर्मचारी कपात प्रामुख्याने कंपनीच्या ग्राहक सेवा विभागात झाली असून, यामागे कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) चा वाढता वापर आणि फूड डिलिव्हरी व्यवसायातील मंदी हे प्रमुख कारण असल्याचे सांगितले जाते. या निर्णयामुळे गुरुग्राम आणि हैदराबाद येथील कार्यालयांतील कर्मचाऱ्यांवर परिणाम झाला आहे. ही घटना 2025 मधील भारतीय नवउद्योग क्षेत्रातील एक मोठी कर्मचारी कपात मानली जात आहे. कंपनीने या निर्णयासाठी खराब कामगिरी आणि शिस्तभंगाचे कारण दिले आहे.
झोमॅटोच्या या निर्णयामुळे प्रभावित कर्मचाऱ्यांच्या भविष्यासाठी चिंता व्यक्त केली जात आहे, तसेच ऑटोमेशनमुळे रोजगारांवर होणाऱ्या परिणामांबद्दल चर्चा सुरू झाली आहे. झोमॅटोने सुमारे एक वर्षापूर्वी ‘झोमॅटो असोसिएट अॅक्सिलरेटर प्रोग्राम’ (ZAAP) अंतर्गत 1,500 कर्मचाऱ्यांना ग्राहक सेवा विभागात कामावर घेतले होते. या कर्मचाऱ्यांना कंपनीने विक्री, ऑपरेशन्स, प्रोग्राम मॅनेजमेंट, सप्लाय चेन आणि इतर विभागांमध्ये बढती देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, या पैकी 600 कर्मचाऱ्यांचे करार नूतनीकरण न करता त्यांना कामावरून काढण्यात आले.
ही कपात मार्च 2025 च्या शेवटच्या आठवड्यात सुरू झाली आणि 1 एप्रिल रोजी बातम्यांमध्ये याची पुष्टी झाली. काही माजी कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर दावा केला की, त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता अचानक कामावरून काढले गेले. या कर्मचारी कपातीच्या काही आठवड्यांपूर्वीच झोमॅटोने ‘नगेट’ (Nugget) नावाचे एआय आधारित ग्राहक सेवा प्लॅटफॉर्म लॉन्च केले होते. हे प्लॅटफॉर्म झोमॅटो, ब्लिंकिट आणि हायपरप्युअरसाठी दरमहा 1.5 कोटींहून अधिक ग्राहक संवाद हाताळते, ज्यामुळे मानवी कर्मचाऱ्यांची गरज कमी झाली आहे.
झोमॅटोने 600 कर्मचाऱ्यांना काढण्यामागे अनेक कारणे असल्याचे समजते. कंपनीच्या मुख्य फूड डिलिव्हरी व्यवसायात वाढीचा वेग मंदावला आहे. बाजारातील स्पर्धा आणि ग्राहकांच्या बदलत्या सवयींमुळे हा व्यवसाय दबावाखाली आहे. झोमॅटोची क्विक कॉमर्स शाखा असलेल्या ब्लिंकिटमध्ये वाढता आर्थिक तोटा दिसून येत आहे, ज्यामुळे कंपनीवर खर्च कमी करण्याचे दबाव आहे. यासह नगेटसारख्या एआय तंत्रज्ञानाच्या वापरामुळे ग्राहक सेवेतील अनेक कामे स्वयंचलित झाली आहेत. यामुळे कर्मचाऱ्यांची आवश्यकता कमी झाली आणि खर्च कपातीला प्राधान्य मिळाले. काही कर्मचाऱ्यांना खराब कामगिरी आणि वेळेच्या शिस्तीच्या कारणास्तव काढल्याचे सांगितले जाते, जरी हे कारण सर्वांना लागू होत नाही.
कामावरून काढलेल्या कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली आहे. एका माजी कर्मचाऱ्याने सांगितले की, हा निर्णय अनपेक्षित होता. आम्हाला कोणतीही सूचना न देता एका रात्रीत कामावरून काढले गेले. आम्हाला फक्त एक महिन्याचा पगार देऊन 'हसत हसत जा' असे सांगितले गेले. दुसऱ्या एका कर्मचाऱ्याने दावा केला की, त्याला फक्त 28 मिनिटे उशीर झाल्यामुळे काढले गेले, जे हास्यास्पद आणि अन्यायकारक आहे. या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, त्यांनी कंपनीसाठी मेहनत घेतली, पण त्यांना योग्य वागणूक मिळाली नाही. झोमॅटोच्या या निर्णयाने कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला असून, काहींनी कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे. (हेही वाचा: Highest Salary Hikes in 2025: विद्यामना वर्षात कोणत्या क्षेत्रात होईल अधिक पगारवाढ? E-Commerce Sector अधिक चर्चेत; घ्या अधिक जाणून)
या कर्मचारी कपातीमुळे भारतीय स्टार्टअप क्षेत्रात नोकरीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत. एआय आणि ऑटोमेशनचा वाढता वापर अनेक क्षेत्रांतील नोकऱ्यांवर परिणाम करत आहे. उद्योग तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ही कपात कंपनीच्या खर्च नियंत्रण आणि कार्यक्षमता वाढवण्याच्या धोरणाचा भाग आहे, परंतु कर्मचाऱ्यांवर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे. झोमॅटोने अद्याप या कपातीवर अधिकृत निवेदन जारी केलेले नाही. मात्र, नगेटच्या यशामुळे कंपनी भविष्यात आणखी ऑटोमेशनवर भर देईल, असे संकेत मिळत आहेत. यामुळे ग्राहक सेवेतील आणखी नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात.