Photo Credit -Wikimedia Commons

Meta Mass Layoffs: मार्क झुकरबर्गच्या नेतृत्वाखालील मेटा (Meta) कंपनी पुढील आठवड्यात त्यांच्या नियोजित कर्मचारी कपातीची (Meta Mass Layoffs) अंमलबजावणी करणार आहे. रिपोर्ट्सनुसार, कंपनी 3 हजारहून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकणार आहे. कंपनी मशीन लर्निंग अभियंत्यांच्या भरतीला गती देण्यावर लक्ष केंद्रित करेल, असा आशयाचा मेल कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आला आहे.

रॉयटर्सच्या वृत्तानुसार, मेटाने कर्मचाऱ्यांना कळवले की सोमवारी सकाळी 5 वाजता (स्थानिक वेळेनुसार) कर्मचाऱ्यांना कपात सुरू होईल. यामध्ये अमेरिकेसह बहुतेक देशांमध्ये नोकरीवरून काढून टाकण्यात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस मिळेल. तथापि, युरोपमधील कर्मचाऱ्यांना स्थानिक नियमांमुळे टाळेबंदी टाळण्याची संधी मिळेल. ही सूट जर्मनी, फ्रान्स, इटली आणि नेदरलँड्समधील कर्मचाऱ्यांना दिली जाईल, तर आशिया, आफ्रिका आणि युरोपमधील इतर देशांमध्ये 11 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान टाळेबंदीच्या सूचना दिल्या जातील. (हेही वाचा - Infosys Layoffs: इन्फोसिसने 300 हून अधिक फ्रेशर्सना कामावरून काढून टाकले; तब्बल अडीच वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर मिळाली होती नोकरी)

कमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ -

मेटाने यापूर्वी सांगितलं आहे की, ते त्यांच्या 'सर्वात वाईट कामगिरी करणाऱ्या' कर्मचाऱ्यांपैकी 5 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची योजना आखत आहे. कंपनीने असेही म्हटले आहे की काही पदांसाठी पुनर्नियुक्ती प्रक्रिया केली जाईल. मेटाच्या कार्मिक प्रमुख जेनेल गेल यांनी सांगितले की, पूर्वीप्रमाणे कंपनीच्या टाळेबंदी प्रक्रियेदरम्यान कार्यालये बंद केली जाणार नाहीत. (हेही वाचा: Microsoft Layoffs: कमी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मायक्रोसॉफ्टने दिला नारळ)

कंपनी मशीन लर्निंग अभियंत्यांची भरती करणार -

मेटाने कर्मचाऱ्यांना अंतर्गत मेमोमध्ये मशीन लर्निंग अभियंते आणि इतर प्रमुख अभियांत्रिकी भूमिकांसाठी भरती प्रक्रियेत मदत करण्याची विनंती केली आहे. ही प्रक्रिया 11 फेब्रुवारी ते 13 मार्च दरम्यान केली जाईल. मेटाचे उपाध्यक्ष पेंग फॅन यांनी कर्मचाऱ्यांचे आभार मानले आणि सांगितले की यामुळे कंपनीच्या प्राधान्यक्रमांना आणि भरतीच्या उद्दिष्टांना मदत होईल.