
बिरा 91 (Bira 91) हा भारतीय एक लोकप्रिय बिअर ब्रँड असून, तो 2015 मध्ये B9 Beverages Pvt. Ltd. द्वारे सुरू करण्यात आला. ही बिअर गव्ह, बार्ली आणि हॉप्सपासून तयार केली जाते. बिरा 91 च्या उत्पादनांमध्ये विविध प्रकारच्या बिअरचा समावेश आहे. तर आता बिरा 91 ची कंपनी बी9 बेव्हरेजेसने आपल्या नावातून 'प्रायव्हेट' हा शब्द काढून टाकला आहे. तर तुम्ही म्हणाला यात काय विशेष? तर हा एक शब्द काढल्याने कंपनीला तब्बल 80 कोटी रुपयांचे थेट नुकसान झाले आहे. बी9 बेव्हरेजेस प्रायव्हेट लिमिटेडने अलीकडेच त्यांच्या नावातून 'प्रायव्हेट' हा शब्द काढून टाकून, त्यांचे नाव 'बी9 बेव्हरेजेस लिमिटेड' असे बदलले आहे.
पुढील वर्षी 2026 मध्ये आयपीओच्या योजनेपूर्वी हा निर्णय घेण्यात आला आहे. नावातील हा बदल आता विकल्या जाणाऱ्या सर्व उत्पादनांवर छापावा लागेल. त्यामुळे, उत्पादन लेबल्सच्या पुनर्मुद्रणामुळे कंपनीची विक्री काही महिन्यांसाठी थांबली. नाव बदलल्यामुळे इन्व्हेंटरी निरुपयोगी किंवा विक्रीयोग्य झाली आणि त्यामुळे कंपनीला 80 कोटी रुपयांचे इन्व्हेंटरी नुकसान सहन करावे लागले. यामुळे कंपनीला थेट आर्थिक नुकसान झाले आणि आर्थिक वर्ष 2024 मध्ये तिचा तोटा 68 टक्क्यांनी वाढला, असे कंपनीच्या हवाल्याने एका आर्थिक अहवालात म्हटले आहे.
2023-24 या आर्थिक वर्षात बी9 बेव्हरेजेसला 748 कोटी रुपयांचा निव्वळ तोटा झाला. वर्षभरातील त्यांचा तोटा त्यांची एकूण विक्री 638 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता, जो आर्थिक वर्ष 23 च्या तुलनेत 22 टक्क्यांनी कमी होता. नाव बदलल्यामुळे नव्या उत्पादनासाठी 4-6 महिन्यांचा कालावधी लागला. यादरम्यान कंपनीला लेबल पुन्हा नोंदणी करावी लागली आणि राज्यांना पुन्हा अर्ज करावा लागला, परिणामी त्यांच्या उत्पादनांची मागणी असूनही अनेक महिने विक्री झाली नाही. परिणामी, आर्थिक वर्ष 23 मध्ये नऊ दशलक्ष विक्री झाली होती, ती आर्थिक वर्ष 24 मध्ये 6-7 दशलक्ष पर्यंत घसरली. (हेही वाचा: Cancer Causing Chemical in Beer: बिअरमध्ये आढळले कॅन्सरचा धोका वाढवणारे रसायन; समोर आला धक्कादायक अहवाल, शास्त्रज्ञांनी दिला इशारा)
बिराने दशकापूर्वी बेल्जियममधून हेफेवेइझेन-शैलीतील पेये आयात करून सुरुवात केली होती परंतु नंतर किफायतशीरतेमुळे त्यांनी भारतात ब्रूइंग सुरू केले. दरम्यान, जेव्हा एखादी कंपनी 'प्रायव्हेट लिमिटेड' वरून 'लिमिटेड' मध्ये बदलते तेव्हा, ती खाजगी मर्यादित कंपनीतून सार्वजनिक मर्यादित कंपनीत रूपांतरित होते, म्हणजेच ती लोकांकडून भांडवल उभारू शकते.यासाठी किमान सात भागधारकांची आवश्यकता असते, तर खाजगी कंपनीला किमान दोन भागधारकांची आवश्यकता असते. खाजगी कंपनीशी तुलना करता, सार्वजनिक कंपनीमध्ये शेअर्स सहजपणे ट्रान्सफर करता येतात. तसेच सार्वजनिक कंपन्यांना अनिवार्य आर्थिक अहवाल देण्यासह कठोर प्रकटीकरण नियमांचे पालन करावे लागेल.