Pune Fuel Scam | (Photo Credit: Instagram)

Fuel Adulteration in Pimpri-Chinchwad: पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवड शहरात अतिशय धक्कादायक असात इंधन भेसळ घोटाळा (Pune Fuel Scam) पुढे आला आहे. शहर परिसरातील शाहुनगर परिसरातील एका पेट्रोल पंपावर चक्क केवळ 20% पेट्रोल आणि तब्बल 80% टक्के पाणी मिसळून (Water Mixed With Petrol) विकले जात आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम (Hp Petrol Pump Pimpri-Chinchwad) संचालित भोसले पेट्रोल पंपावर इंधन भरणाऱ्या अनेक वाहनचालकांनी इंधन भरण्यासाठी रांगा लावल्या होत्या. मात्र, ज्या ज्या वाहनांमध्ये हे भेसळयुक्त पेट्रोल भरण्यात आले त्या वाहनांमध्ये तत्काळ बिघाड (Vehicle Breakdown) झाल्याची तक्रार चालकांनी केली. ज्यामुळे इंधनाची गुणवत्ता आणि ग्राहकांच्या सुरक्षिततेबद्दल गंभीर चिंता निर्माण झाली आहे.

इंधन भरल्यानंतर वाहनांचा स्टॉल

पिंपरी चिंचवड येथील पेट्रोल पंपावर इंधन भरणाऱ्या वाहनचालकांना आढळून आले की, त्यांनी केवळ एक किंवा दोन लिटर इतकेच पेट्रोल भरले तरीदेखील त्यांच्या वाहनात अचानक बिघाड झाला. समस्या निर्माण झाल्याने इंजिनने काम करणे थांबवले. अनेक वाहनचालकांना शंका आल्याने त्यांनी त्यांच्या वाहनांच्या इंधन टाक्यांची तपासणी केली. चालकांना आढळून आले की, पंपावर ग्राहक म्हणून आपली फसवणूक झाली आहे. कारण, इंधन टाकीत पेट्रोल ऐवजी चक्क पाणी असलेले द्रव मिश्रण आहे. इंधन टाकीत पाणी किंवा तत्सम द्रव पदार्थावर पेट्रोल तरंगत होते. मायपुणेप्लसडॉटकॉमने दिलेल्या वृत्तानुसार, एका तपासणीत असे आढळून आले की, दूषिततेचे प्रमाण 80% पाणी ते 20% पेट्रोल इतके जास्त होते, ज्यामुळे अनेक वाहनांचे नुकसान झाले.  (हेही वाचा, Gas Leak in Pune: पिंपरी चिंचवड येथे गॅस गळतीमुळे स्फोट, 5 जण जखमी, पाहा व्हिडीओ)

संभाव्य कारण: इंधन साठवण टाक्यांमध्ये पाणी शिरणे

पेट्रोलमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी आढळणे ही इंधन भेसळ आहे की, नजरचुक हे अद्याप पुढे आले नाही. पण अनेक तज्ज्ञ आणि जाणकारांनी म्हटले आहे की, पंपावर ढिसाळ व्यवस्थापन आणि खराब देखभाल यांमुळे इंधनसाठा केल्या जाणाऱ्या टाक्यांमध्ये पाणी शिरले असावे. ज्यामुळे इंधनात पाणी मिसळले गेले असावे आणि ही समस्या उद्भवली असावी. दरम्यान, प्रशासनाने या घटनेची तातडीने दखल घेतली आहे. अधिकाऱ्यांनी जाणूनबुजून इंधन भेसळ करण्याची शक्यता नाकारली नाही. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या भेसळीचे निश्चित कारण कळण्यासाठी आणि जबाबदारांना जबाबदार धरण्यासाठी सध्या अधिकृत चौकशी सुरू आहे.

ग्राहकांचा संताप आणि चौकशी सुरू

नाराज ग्राहकांनी पेट्रोल पंपावर तात्काळ कारवाईची मागणी केली आहे, अधिकाऱ्यांना स्टोरेज सिस्टमची तपासणी करण्याची आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची विनंती केली आहे. अधिकाऱ्यांनी तपशीलवार तपासणी करणे, इंधनाचे नमुने गोळा करणे आणि आवश्यक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी होत आहे. दरम्यान, या पंपावर इंधन भरणाऱ्या कोणत्याही वाहन चालक, मालकास आपल्या वाहनात अथवा इंजिनमध्ये बिघाड झाल्याची, समस्या उत्पन्न झाल्याचे आढळून आले तर तत्काळ तक्रार करण्याचे अवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by PUNE PULSE (@punepulse)

दरम्यान, महाराष्ट्र इंधन नियामक संस्था आणि ग्राहक संरक्षण अधिकाऱ्यांनी या घटनेची नोंद घेतली आहे. दोषी आढळल्यास, इंधन सुरक्षा मानके कायम राहतील याची खात्री करण्यासाठी जबाबदार पक्षांवर कठोर दंड आणि कायदेशीर परिणाम लादले जातील, त्यासाठी अधिकाऱ्यांनी कारवाई करावी असे अवाहन या संस्थांनी केले आहे.