
Shiv Jayanti 2025 HD Images in Marathi: महाराष्ट्रासाठी आजचा दिवस अतिशय खास आहे. आज मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती (Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2025). त्यांनी शून्यातून केलेली स्वराज्य निर्मिती ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी किल्ल्यावर झाला. त्यांचे वडील शाहाजी भोसले आणि आई जिजाबाई यांनी त्यांच्यावर धार्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांचे संस्कार केले. मात्र शिवरायांचे बालपण त्यांची आई जिजाबाई यांच्या मार्गदर्शनाखाली गेले. लहानपणापासून त्यांना नीतिमत्ता, राज्यव्यवस्था, युद्धकला, गनिमी कावा, घोडेस्वारी अशा अनेक बाबींची शिकवण होती. याच्याच जोरावर शिवाजी महाराजांनी आपल्या धाडसी आणि कुशल नेतृत्वाने मराठा साम्राज्याची स्थापना केली.
शत्रूविरुद्ध लढ्याकरता महाराष्ट्रातल्या डोंगर-दर्यांमधे अनुकूल असलेली गनिमी काव्याची पद्धत वापरून त्यांनी, तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि बलाढ्य मुघल साम्राज्यशाही यांच्याशी लढा दिला. शिवरायांनी कोकण आणि पश्चिम घाटात मराठा राज्याचा विस्तार केला. सिद्धी, पोर्तुगीज, डच आणि इंग्रज यांच्याशी त्यांनी यशस्वी मुत्सद्देगिरी साधली. त्यांच्या समुद्री लढाया विशेषतः सिंधुदुर्ग आणि विजयदुर्ग यांच्या संरक्षणासाठी उभारलेले आरमार तत्कालीन भारतातील सर्वांत बलाढ्य आरमारांपैकी एक होते.
पुढे 6 जून 1674 रोजी रायगड किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा भव्य राज्याभिषेक झाला. अशाप्रकारे एक आदर्श शासनकर्ता, उत्कृष्ट योद्धा व सहिष्णू राजा म्हणून त्यांनी भारतीय आणि विशेषत्वाने महाराष्ट्रीय इतिहासात आपला विशेष ठसा उमटवला आहे. अशा या थोर राजाच्या जन्मदिनी खास Wishes, Quotes, WhatsApp Status, Images, Message च्या माध्यमातून द्या शिवजयंतीच्या शुभेच्छा. (हेही वाचा: Shiv Jayanti 2025 Messages: शिवभक्तांना खास मराठी Wishes, Quotes, WhatsApp Status, Images च्या माध्यमातून द्या छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या शुभेच्छा)






दरम्यान, ‘अफजलखान वध’, ‘शास्ताखानाची बोटे कापणे’, या प्रसंगांतून त्यांचा पराक्रम दिसून येतो. तर पुरंदरचा तह, दिल्लीतील औरंगजेब भेट आणि तेथून सुटका, पन्हाळ्यावरून निसटणे या बिकट प्रसंगांत युक्ती, संयम, धैर्य यांचा मिलाप दिसून येतो. शिवाजी महाराज हे केवळ पराक्रमी योद्धेच नव्हे, तर कुशल प्रशासकही होते. त्यांनी न्याय, करप्रणाली, संरक्षण, व्यापार, कृषी आदी विषयांवर विशेष लक्ष केंद्रित केले. शिवरायांच्या पूर्वी अनेक राजे होऊन गेले व शिवरायांच्यानंतरही अनेक राजे झाले, मात्र सर्वात आदर्श राजा म्हणून शिवाजी महाराजांना ओळखले जाते.