Anganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडीच्या भराडी देवी जत्रेबद्दल '8' खास गोष्टी
Bharadi Devi 2019 (Photo Credits: Instagram)

केवळ महाराष्ट्रातील नव्हे तर देशा-परदेशात कोकणातील ज्या एका जत्रेचं आकर्षण आहे ती म्हणजे आंगणेवाडीची जत्रा. यंदा आंगणेवाडीच्या भराडीदेवीची जत्रा (Anganewadi Bharadi Devi Jatra ) 25 फेब्रुवारी 2019 दिवशी आहे.दरवर्षी लाखो भाविकांच्या गर्दीमध्ये मोठ्या उत्साहात या देवीची जत्रा रंगते. यंदादेखील तसेच मालवण आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या दर्शनाला येणार्‍यांचे मोठ्या उत्सहाने स्वागत करत आहे.  अवघ्या दीड दिवसाच्या या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी अनेक भाविक उत्सुक असतात. मग यात सामान्य नागरिकांपासून अनेक प्रथितयश कलाकार आणि राजकारणी मंडळी हमखास भेट देतात. मग पहा आंगणेवाडीची ही नेमकीभराडीदेवीची जत्रा इतकी वैशिष्ट्यपूर्ण का आहे? Anganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडीच्या भराडी देवी जत्रेसाठी कसे पोहचाल?

आंगणेवाडीच्या भराडीदेवीची खास वैशिष्ट्य

  • मालवण तालुक्यातील आंगणे वाडी हे लहानसे गाव आहे. या गावात 'भराडीदेवी' विराजमान आहे. भरडावर देवी प्रकट झाली म्हणून या देवीचं नाव 'भराडी देवी ' असं ठेवण्यात आलं आहे.भराड म्हणजे माळरान.
  • आंगणेवाडी या गावातील केवळ आंगणे कुटुंबीयांची ही देवी आहे. मात्र नवसाला पावणारी देवी अशी ख्याती असल्याने ग्रामस्थांसोबत सामान्य नागरिकांना तिचे दर्शन खुले असते.
  • आंगणेवाडीतील भराडीदेवीचं मंदिर हे खासगी मंदिर आहे. मात्र भाविकांच्या गर्दी आणि श्रद्धेसाठी ते इतर सर्व भाविकांना खुले असते. गाऱ्हाणं आणि नवस बोलून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी भराडीदेवीचं दर्शन घेतात.
  • दरवर्षी सुमारे 15-16 लाख भाविक भराडीदेवीच्या दर्शनासाठी केवळ दीड दिवसांच्या जत्रेमध्ये सहभागी होतात. यामध्ये सामान्य नागरिक, आंगणे ग्रामस्थ एकत्र पूजा करतात.
  • दीड दिवसाच्या या जत्रेमध्ये पहिला दिवस हा पाहुण्यांसाठी असतो तर दुसरा दिवस हा आंगणे ग्रामस्थांसाठी असतो. प्रामुख्याने आंगणे गावातील माहेरवाशिणी एकत्र येऊन पूजा करतात, महाप्रसाद करतात.
  • आंगणेवाडीच्या भराडीदेवीचा नैवेद्य खास असतो. आंगणे कुटुंबियांच्या माहेरवाशिणी तो अबोल राहून करतात. या जत्रेमध्ये सहभागी झालेल्या प्रत्येक भाविकाला त्याचा लाभ घेता येतो. साऱ्यांसाठी केवळ या आंगणेवाडीच्या महिला प्रसाद बनवतात. Anganewadi Bharadi Devi Jatra 2019: आंगणेवाडीच्या भराडी देवीला भोपळ्याच्या वड्यांचा प्रसाद , 'ताट लावणं' प्रथा म्हणजे काय?

  • धार्मिक महत्त्वासोबतच आंगणेवाडीच्या भराडीदेवी यात्रेमध्ये सांस्कृतिक सोहळा देखील रंगतो. आंगणे ग्रामस्थ एक नाटक करतात त्याला मांडावरचं नाटक म्हणतात. मिरजेहून गोंधळी येतात ते देवीसमोर गोंधळ मांडतात. दशावतार असतो.
  • अनेक राजकारणी मंडळी भराडीदेवीच्या दर्शनाला येतात. यंदा राज ठाकरे देवीच्या दर्शनाला येणार आहेत. तर २०१४ च्या लोकसभा निवडणुकीनंतर 18 खासदारांसह उद्धव ठाकरे भराडी देवीच्या दर्शनाला पोहचले होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर यंदादेखील अनेक राजकीय मंडळी नक्कीच देवीच्या दर्शनाला पोहचण्याची शक्यता आहे. चोख बंदोबस्तामध्ये भराडीदेवीच्या जत्रेची धूम रंगणार आहे.