Most Beautiful Building On Earth: पृथ्वीवरील सर्वात सुंदर वास्तू Museum Of Future चे दुबईमध्ये उद्घाटन; जाणून घ्या काय आहे खास
Museum Of Future (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगातील सर्वात सुंदर इमारत किंवा वास्तू (Most Beautiful Building On Earth) कोणती? असा प्रश्न विचारल्यास तुमच्या डोळ्यासमोर अनेक इमारती उभ्या राहतील. यामध्ये 'म्युझियम ऑफ फ्युचर'चे (Museum Of Future) नाव अग्रस्थानी आहे. 'जगातील सर्वात सुंदर वास्तू' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 'म्युझियम ऑफ फ्युचर'चे दुबईत (Dubai) एका शानदार सोहळ्यात उद्घाटन करण्यात आले. ही इमारत बांधण्यासाठी नऊ वर्षे लागली. ही सात मजली इमारत 77 मीटर उंच असून ती 30 हजार चौरस मीटरमध्ये बांधण्यात आली आहे. ही इमारत जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे.

'म्युझियम ऑफ फ्युचर' हे दुबईमध्ये बांधण्यात आलेल्या उत्तम वास्तुशिल्पाच्या नमुन्यांमधील नवीन भर आहे, ज्याची जगभरात चर्चा होत आहे. एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की हे संग्रहालय मानवतेच्या भविष्याची रूपरेषा प्रदर्शित करते. यासोबतच हे संग्रहालय मानवी विकासातील आव्हाने आणि संधींवर नाविन्यपूर्ण उपायांसाठी प्रेरणा देते. इमारत दिसायला प्रचंड सुंदर असून, जगभरातील लोक त्याचे खूप कौतुक करत आहेत.

युएईचे कॅबिनेट व्यवहार मंत्री आणि दुबई फ्यूचर फाउंडेशनचे अध्यक्ष मोहम्मद अल गेर्गवी यांनी मंगळवारी उद्घाटन समारंभात सांगितले की, 'म्युझियम ऑफ फ्युचर' हे जिवंत संग्रहालय आहे. किल्ला डिझाईनचे वास्तुविशारद, सीन किल्ला यांनी या इमारतीची रचना केली आहे आणि ती अभियांत्रिकी आणि संगणक-सहाय्यित डिझाइनचा उत्कृष्ट नमुना आहे. या संग्रहालयाची फ्रेम फायबरग्लास आणि स्टेनलेस स्टीलची आहे. नॅशनल जिओग्राफिकने याआधीच जगातील 14 सुंदर संग्रहालयांमध्ये त्याचा समावेश केला आहे.

याठिकाणी रोबोटनिर्मित 1,024 कलाकृती ठेवण्यात आल्या आहेत. रात्रीच्या वेळी ही इमारत दिव्यांनी उजळून निघते, ज्यामुळे त्याचे सौंदर्य आणखीनच वाढते. ही वास्तू पाहण्यासाठी वेबसाइटवरूनही तिकीट बुक करता येईल. याचे तिकीट साधारण 2942 रुपये आहे. सकाळी 10 ते संध्याकाळी 6 या वेळेत ते पाहुण्यांसाठी खुले असेल.