Photo Credit- X

Dunith Wellalage Father Death: आशिया कपमध्ये श्रीलंकेने धमाकेदार विजय मिळवत सुपर-४ मध्ये आपले स्थान निश्चित केले. संपूर्ण संघ मैदानावर विजयाचा जल्लोष साजरा करत होता, पण त्याच क्षणी संघाचा स्टार फिरकीपटू दुनिथ वेल्लालागेवर दु:खाचा डोंगर कोसळला. एका अत्यंत दुर्दैवी बातमीने त्याच्या आनंदाचे रूपांतर क्षणात शोकामध्ये झाले. दुनिथने आपल्या संघाच्या विजयासाठी मैदानात घाम गाळला, पण त्याला कदाचित कल्पनाही नव्हती की एक मोठे नुकसान त्याची वाट पाहत आहे. ही बातमी केवळ दुनिथसाठीच नव्हे, तर संपूर्ण श्रीलंकन संघासाठी एक अत्यंत भावूक क्षण होता.

सामना संपल्यावर मिळाली दुर्दैवी बातमी

अफगाणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर, श्रीलंकन संघाच्या मॅनेजरने दुनिथ वेल्लालागेला त्याच्या वडिलांच्या, सुरंगा वेल्लालागे यांच्या निधनाची बातमी दिली. त्यांचे निधन हृदयविकाराच्या झटक्याने झाले. या दुःखद प्रसंगात संघातील सर्व खेळाडूंनी त्याला धीर दिला आणि सांत्वन केले. एका श्रीलंकन पत्रकाराने दुनिथचा एक फोटोही शेअर केला, ज्यात टीम मॅनेजर त्याला धीर देताना दिसत आहेत.

वडीलही होते एक सन्मानित क्रिकेटर

प्रसिद्ध समालोचक आणि माजी क्रिकेटपटू रसेल अर्नोल्ड यांनीही या दुर्दैवी बातमीची पुष्टी केली. त्यांनी सांगितले की, दुनिथचे वडील सुरंगा वेल्लालागे हे देखील एक सन्मानित क्रिकेटर होते आणि त्यांनी 'प्रिन्स ऑफ वेल्स कॉलेज'च्या संघाचे नेतृत्व केले होते. अर्नोल्ड म्हणाले की, जेव्हा ते स्वतः त्यांच्या शाळेच्या संघाचे कर्णधार होते, तेव्हा सुरंगा त्यांच्या प्रतिस्पर्धी संघाचे कर्णधार होते. या बातमीमुळे संपूर्ण संघ शोकमग्न असल्याचे त्यांनी सांगितले.

Asia Cup 2025: सुपर-४ मधील सर्व संघ निश्चित, नोट करुन घ्या भारताचे सामने कधी अन् कोणत्या संघांसोबत होणार?

एकाच षटकात खाल्ले होते ५ षटकार

या सामन्यात दुनिथ वेल्लालागेची कामगिरी संमिश्र राहिली. त्याने अफगाणिस्तानच्या मोहम्मद नबीचा महत्त्वाचा झेल सोडला, ज्यानंतर नबीने दुनिथच्या एकाच षटकात तब्बल पाच षटकार मारले. या षटकात दुनिथने एकूण ३२ धावा दिल्या, जो श्रीलंकेच्या टी-२० इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात महागडा षटक ठरला. मात्र, या आव्हानानंतरही श्रीलंकेने सामना जिंकून सुपर-४ मध्ये प्रवेश केला, जिथे त्यांचा सामना भारत, पाकिस्तान आणि बांगलादेशसोबत होईल.