Asia Cup 2025 (Photo Credit- X)

Asia Cup 2025 Super 4: यूएईमध्ये (UAE) सुरू असलेल्या आशिया कप २०२५ चा (Asia Cup 2025) थरार आता चांगलाच वाढला आहे. श्रीलंकेच्या क्रिकेट संघाने अफगाणिस्तानचा ६ विकेट्सने पराभव करून सुपर फोरमध्ये प्रवेश केला आहे. प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने १६९ धावा केल्या. त्यानंतर कुसल मेंडिसच्या दमदार अर्धशतकामुळे श्रीलंकेने लक्ष्य सहज गाठले. श्रीलंकेने त्यांचे गट टप्प्यातील तिन्ही सामने जिंकले आहेत. (हे देखील वाचा: IND vs PAK: ‘नो हँडशेक’ वादावर पाकिस्तानची तक्रार; पराभवानंतर अपमान सहन न झाल्याने एसीसीकडे धाव)

कुसल मेंडिसच्या अर्धशतकामुळे विजय निश्चित 

कुसल मेंडिसने श्रीलंकेच्या क्रिकेट संघाला दमदार सुरुवात करून दिली. त्याने ५२ चेंडूत १० चौकारांसह ७४ धावा केल्या. कुसल परेरानेही २८ धावांचे योगदान दिले. शेवटी, कामिंडू मेंडिसने १३ चेंडूत २६ धावा केल्या आणि श्रीलंकेने लक्ष्याचा सहज पाठलाग केला.

सुपर ४ मधील चार संघ निश्चित

भारत आणि पाकिस्तान यांनी ग्रुप ए मधून सुपर ४ साठी पात्रता मिळवली आहे. श्रीलंका आणि बांगलादेश यांनी ग्रुप बी मधून सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे. सुपर ४ चे सामने आता २० सप्टेंबरपासून खेळवले जातील. सुपर ४ पॉइंट टेबलमध्ये टॉप दोनमध्ये स्थान मिळवणारे संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरतील.

टीम इंडिया कसे खेळणार ५ सामने?

ग्रुप-ए मध्ये भारतासह पाकिस्तान, यूएई आणि ओमानचा समावेश होता. या गटातून यूएई आणि ओमान स्पर्धेबाहेर झाले असून, भारत आणि पाकिस्तानने सुपर-४ मध्ये प्रवेश केला आहे. टीम इंडियाने ग्रुप स्टेजमधील दोन सामने जिंकले असून, अद्याप एक सामना शिल्लक आहे. सुपर-४ मध्ये प्रवेश केल्यानंतर फायनलमध्ये पोहोचल्यास भारतीय संघ एकूण ५ सामने खेळू शकतो.

  • १९ सप्टेंबर: ग्रुप स्टेजचा शेवटचा सामना ओमानविरुद्ध (अबु धाबी)
  • १९ सप्टेंबर: सुपर-४ चा पहिला सामना पाकिस्तानविरुद्ध (दुबई)
  • २४ सप्टेंबर: सुपर-४ चा दुसरा सामना बांगलादेशविरुद्ध (दुबई)
  • २६ सप्टेंबर: सुपर-४ चा तिसरा सामना श्रीलंकाविरुद्ध (दुबई)
  • २८ सप्टेंबर: संभाव्य अंतिम सामना (दुबई)

आशिया कप २०२५: सुपर-४ चे संपूर्ण वेळापत्रक

  • २० सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध श्रीलंका
  • २१ सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान
  • २३ सप्टेंबर: पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका
  • २४ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध भारत
  • २५ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान
  • २६ सप्टेंबर: भारत विरुद्ध श्रीलंका

स्पर्धेत टीम इंडिया सर्वात प्रबळ दावेदार

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आशिया कप २०२५ चा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. टीम इंडियाने पहिले दोन सामने एकतर्फी जिंकले आहेत. सुपर-४ मध्ये श्रीलंकेचा संघ भारताला कडवी झुंज देऊ शकतो, कारण त्यांनी त्यांचे तीनही ग्रुप स्टेज सामने जिंकले आहेत. तसेच, २१ सप्टेंबर रोजी पाकिस्तानविरुद्ध होणारा सामनाही रोमांचक होण्याची अपेक्षा आहे. भारताने आतापर्यंत ८ वेळा आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे आणि यंदा ९ व्यांदा ट्रॉफी उंचावण्याचा निर्धार केला आहे.