PAK Team (Photo Credit- X)

भारतीय संघाने आशिया कपच्या सहाव्या सामन्यात पाकिस्तानचा ७ विकेट्सने दणदणीत पराभव केला. सामन्यानंतर भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानच्या खेळाडूंशी हात मिळवण्यास नकार दिला, ज्याचे भारतीय चाहत्यांनी कौतुक केले. मात्र, पाकिस्तानला हा जाहीर अपमान सहन झाला नाही आणि त्यांनी या 'नो हँडशेक' (No Handshake) वादावर भारतीय संघाविरोधात तक्रार दाखल केली आहे. पीटीआयच्या वृत्तानुसार, भारतीय खेळाडूंनी सामन्यानंतर हात न मिळवल्याने पाकिस्तानचे टीम मॅनेजमेंट नाराज झाले आहे. याच कारणामुळे त्यांनी एसीसी (Asian Cricket Council) आणि मॅच रेफरी अँडी पीक्रॉफ्ट यांच्याकडे टीम इंडियाविरुद्ध अधिकृत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी हे वर्तन 'खेळभावनेच्या (Spirit of the Game) विरोधात' असल्याचे म्हटले आहे.

पीसीबीने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, 'टीम मॅनेजर नवीद चीमा यांनी भारतीय खेळाडूंच्या या वर्तनाचा निषेध केला आहे. हे खेळाच्या भावनेच्या पूर्णपणे विरोधात आहे. निषेध म्हणून आम्ही आमच्या कर्णधाराला पोस्ट-मॅच सेरेमनीसाठी पाठवले नाही.'

टॉसवेळीही हात मिळवण्यास नकार

मिळालेल्या वृत्तानुसार, टॉसवेळीही दोन्ही कर्णधारांनी हात मिळवला नव्हता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने सांगितले की, मॅच रेफरी अँडी पीक्रॉफ्ट यांनीच पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगाला टॉसवेळी सूर्यकुमार यादवसोबत हात न मिळवण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, सामन्यानंतर हात मिळवण्यावर अशी कोणतीही बंदी नव्हती, असेही त्यांनी सांगितले.

विजयानंतर लगेच पॅव्हेलियनमध्ये परतले भारतीय खेळाडू

भारताला विजयासाठी १२८ धावांची गरज होती आणि सूर्यकुमार यादवने षटकार मारून संघाला विजय मिळवून दिला. विजयी शॉट मारल्यानंतर तो आणि सहकारी फलंदाज शिवम दुबे लगेचच ड्रेसिंग रूममध्ये परतले. भारतीय खेळाडूंनी आपापसात विजय साजरा केला आणि आत निघून गेले. पाकिस्तानचे मुख्य प्रशिक्षक माईक हेसन यांनी सांगितले की, त्यांचे खेळाडू हात मिळवण्यासाठी उभे होते, पण भारतीय संघाने ड्रेसिंग रूमचा दरवाजा बंद करून घेतला.