Covid-19 Omicron Variant: चीनमध्ये पुन्हा होऊ शकतो कोरोना विषाणूचा उद्रेक; दिवसाला समोर येऊ शकतात साडेसहा लाख रुग्ण- तज्ज्ञांचा इशारा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Pixabay)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) नवीन ओमिक्रॉन व्हेरिएंटबाबत (Omicron Variant) जग आधीच दहशतीत आहे, आता कोविड-19 संसर्गाबाबत एक नवीन इशारा देण्यात आला आहे. चीनमध्ये (China) पुन्हा एकदा कोरोना संकटाचा कहर माजू शकतो, असे एका अभ्यासातून समोर आले आहे. तज्ज्ञांच्या मते, चीनमध्ये येत्या काही दिवसांत कोरोनाचा उद्रेक इतका मोठा असेल की दररोज सुमारे साडेसहा लाख पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होऊ शकते. जर हे टाळायचे असेल तर चीनला आपले शून्य-कोविड धोरण कायम ठेवावे लागेल.

पेकिंग युनिव्हर्सिटीच्या गणितज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार, चीनने आपले शून्य-कोविड धोरण सोडले आणि इतर देशांवर लादलेले प्रवासी निर्बंध उठवल्यास दिवसाला 630,000 हून अधिक कोरोनाव्हायरस संसर्गाचा सामना करावा लागू शकतो. अहवालानुसार संपूर्ण लसीकरणानंतरच चीनमध्ये प्रवासावरील बंदी उठवली जावी. टीमने यूएस, यूके, स्पेन, फ्रान्स आणि इस्रायलमधील ऑगस्टमधील डेटाच्या आधारे अभ्यास केला आहे.

अहवालात असे म्हटले आहे की, जर चीनने अमेरिकेत महामारी रोखण्यासाठी वापरलेली रणनीती अवलंबली तर तेथे एका दिवसात 6 लाख 37 हजार 155 रुग्ण आढळू शकतात. ब्रिटनचे मॉडेल स्वीकारल्यास 2 लाख 75 हजार 793 पर्यंत आणि फ्रान्ससारखे धोरण स्वीकारल्यास 4 लाख 54 हजार 198 प्रकरणे समोर येऊ शकतात. कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर चीनने देशात कडक निर्बंध लादले आहेत. जेव्हाही कोणत्याही भागात कोरोनाचे रुग्ण आढळतात तेव्हा संक्रमितांचा शोध घेऊन त्यांना अलग ठेवले जातात आणि त्यांच्यावर उपचार केले जातात. (हेही वाचा: 'डेल्टा'पेक्षाही धोकादायक कोरोनाचा नवा स्ट्रेन Omicron; जगासमोर नवे आव्हान, घ्या जाणून)

चीनच्या आरोग्य प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, 27 नोव्हेंबरपर्यंत चीनमध्ये कोरोनाव्हायरसच्या 23 नवीन प्रकरणांची पुष्टी झाली आहे. अधिकृत ग्लोबल टाइम्सला माहिती देताना, चीनच्या आघाडीच्या लस उत्पादकांपैकी एक असलेल्या सिनोवॅक बायोटेकने सांगितले की, कंपनी सध्या कोविड, ओमिक्रॉनच्या नवीन प्रकारावर पूर्ण लक्ष देत आहे. चीनने भारतासह बहुतांश देशांवर निर्बंध लादून अनेक देशांसाठी आपल्या सीमा बंद केल्या आहेत.