Anand Mahindra to Gift Tractor: बिहारच्या Laungi Bhuiyan यांनी 30 वर्षात खोदला 3 किमी लांबीचा कालवा; आनंद महिंद्रा यांच्याकडून भेट म्हणून ट्रॅक्टर देण्याची घोषणा
Laungi Bhuiyan (Photo Credits: @rohinverma2410 Twitter)

काही दिवसांपूर्वी बातमी आली होती की, बिहारमधील गया (Gaya) जिल्ह्यातील कोठिलवा (Kothilawa) गावात राहणारे 70 वर्षीय लौंगी भुईया (Laungi Bhuiyan) यांनी 30 वर्षे परिश्रम घेऊन तब्बल तीन किमी लांबीचा कालवा (Canal) खोदला. आता आता या व्यक्तीला महिंद्रा समूहाचे अध्यक्ष आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी एक भेट जाहीर केली आहे. शेतकरी लौंगी भुईया यांच्या या कामासाठी महिंद्राने त्यांना महिंद्रा ट्रॅक्टर भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत त्यांनी ट्वीट करत माहिती दिली आहे.

याआधी अरुण कुमार यांनी एक ट्वीट केले होते, ज्यामध्ये ते म्हणतात. ‘गयाच्या लौंगी माँझी यांनी आपल्या आयुष्याची 30 वर्षे घालवून कालवा खोदला. आजही त्यांना ट्रॅक्टरशिवाय काही नको आहे. त्यांनी मला सांगितले आहे की जर त्यांना ट्रॅक्टर मिळाला तर त्यांना मोठी मदत होईल.’ याच ट्वीटचा आधार घेऊन आनंद महिंद्रा यांनी त्यांना ट्रॅक्टर देऊन करण्याची घोषणा केली.

आपल्या ट्वीटमध्ये महिंद्रा म्हणतात, ‘त्यांना एक ट्रॅक्टर देताना मला आनंद होईल. तुम्हाला माहिती आहेच, मी लौंगी भुईया यांच्या कामगिरीबाबत ट्वीट केले होते, ज्यात म्हटले होते की, त्यांचा हा कालवा ताज किंवा इतर पिरॅमिड्स स्मारकाइतकाच प्रभावशाली आहे. आता त्यांनी आमचा ट्रॅक्टर वापरला तर तो आमचा सन्मान असेल. आमची टीम त्यांच्यापर्यंत कशी पोहोचू शकते?’ (हेही वाचा: बिहारमधील 70 वर्षीय Laungi Bhuiyan यांचा पराक्रम; शेतीला पाणी मिळावे म्हणून 30 वर्षांत खोदला 3 किमी लांबीचा कालवा)

पहा आनंद महिंद्रा ट्वीट -

अशाप्रकारे याधीही आनंद महिंद्र यांनी अनेकांना मदत केली आहे.

दरम्यान, 70 वर्षीय लौंगी भुईया 30 वर्षे मेहनत घेऊन, तीन किमी लांबीचा कालवा बांधला. आता या कालव्याद्वारे लोकांना सिंचनामध्ये अतिशय मदत होत असून, शेतात भरपूर पाणी मिळत आहे. या कालव्याचा लाभ 3 गावांतील 3000 लोक घेत आहेत. पावसाळ्यात डोंगरावरून पडणारे पाणी थेट नदीत जात असे व याच गोष्टीचे भुईया यांना दुःख व्हायचे. हे पाणी शेतात येऊ शकले तर ग्रामस्थांना मदत होईल, असे त्यांना वाटले. हे लक्षात घेऊन त्यांनी कालवा खोदण्याचे काम सुरू केले.