
WTC Points Table 2025: भारतीय क्रिकेट संघाने शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली आणखी एक कसोटी सामना जिंकत वेस्टइंडिजविरुद्धची दोन सामन्यांची मालिका 2-0 ने आपल्या नावावर केली आहे. दुसरा कसोटी सामना भारताने 7 गडी राखून जिंकला. जरी टीम इंडिया लवकरात लवकर सामना जिंकण्याच्या तयारीत होती, तरी वेस्टइंडिजने शेवटपर्यंत झुंज दिली आणि सामना पाचव्या दिवशी संपला. या विजयासह भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) गुणफलकावरील पीसीटी (Points Percentage) वाढला आहे. मात्र, अजूनही दोन संघ भारताच्या पुढे आहेत.
भारत अजूनही तिसऱ्या स्थानावर कायम
भारत आणि वेस्टइंडिज यांच्यातील ही दोन सामन्यांची मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपअंतर्गत खेळली गेली. या विजयापूर्वी भारत तिसऱ्या क्रमांकावर होता आणि आता देखील त्याच स्थानावर आहे. मात्र, त्याच्या पीसीटी मध्ये वाढ झाली आहे. या सामन्यापूर्वी भारताचा पीसीटी 55.56 होता, जो आता 61.90 झाला आहे (राउंड फिगरनुसार 62%). तरीदेखील भारत सध्या तिसऱ्या क्रमांकावरच आहे.
ऑस्ट्रेलिया अव्वल, श्रीलंका दुसऱ्या स्थानावर
सध्याच्या WTC गुणफलकात ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. त्यांनी तीनही कसोटी सामने जिंकले असून त्यांचे पीसीटी 100% आहे. श्रीलंका दुसऱ्या स्थानावर आहे. दोन सामने खेळून एक विजय आणि एक बरोबरी अशी त्यांची कामगिरी आहे. त्यामुळे त्यांचा पीसीटी 66.67 इतका आहे.
ICC च्या नियमानुसार संघांचे क्रमांकन पीसीटी वर ठरवले जाते, म्हणूनच श्रीलंका भारतापेक्षा वर आहे.
भारतीय संघाची आतापर्यंतची कामगिरी
भारतीय संघाने या WTC चक्रात आतापर्यंत 6 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 जिंकले, 2 हरले आणि 1 बरोबरीत राहिला. भारताचे एकूण गुण 40 असून पीसीटी 61.90 आहे. पुढील महिन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या दोन कसोट्यांच्या मालिकेत भारताला आपले स्थान सुधारण्याची मोठी संधी आहे.
बाकी संघांची स्थिती
भारत, ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका नंतर इंग्लंड चौथ्या क्रमांकावर आहे, त्यांचा पीसीटी 43.33 आहे.
बांग्लादेश पाचव्या क्रमांकावर असून त्याचा पीसीटी 16.67 आहे. वेस्टइंडिजने आतापर्यंत पाच सामने खेळले आहेत, परंतु एकही विजय न मिळाल्याने त्यांचा पीसीटी शून्य आहे. आगामी सामन्यांनंतर पुन्हा एकदा गुणतालिकेत मोठे बदल दिसण्याची शक्यता आहे.