
Tukdoji Maharaj Punyatithi 2025: आज, ११ ऑक्टोबर रोजी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची पुण्यतिथी (Rashtrasant Tukdoji Maharaj Death Anniversary) आहे. त्यांच्या अतुलनीय कार्यामुळे अवघा देश त्यांना राष्ट्रसंत म्हणून ओळखतो. त्यांचे पूर्ण नाव माणिक बंडोजी इंगळे (Rashtrasant Tukdoji Maharaj) असे होते. त्यांचा जन्म १९०९ मध्ये झाला आणि १९६८ मध्ये त्यांचे निधन झाले. त्यांनी १९३५ मध्ये मोझरी येथे गुरुकुंज आश्रमाची स्थापना केली. तुकडोजी महाराजांनी त्यांच्या कार्याद्वारे समाजाला आत्मसंयमन आणि नैतिकतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांनी 'ग्रामगीता' या ग्रंथातून लोकांना आत्मसंयमनाचे (Self-Control) महत्त्व समजावून सांगितले. त्यांनी मराठी आणि हिंदी अशा दोन्ही भाषांतून काव्यरचना केली.
प्रबोधनाची पद्धत
त्यांच्या प्रबोधनाचे एक खास वैशिष्ट्य होते, ते म्हणजे खंजिरी भजन. या खंजिरी भजनातून ते समाजप्रबोधनाचे कार्य करत असत. त्यांचे प्रेरणादायी विचार आजही समाजाला योग्य दिशा देण्याचे काम करतात.
मरणास भिऊन रडत बसण्यापेक्षा
मरणे अमर कसे होईल याची चिंता करा
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज!
माजी पाप आणि पुण्याची अत्यंत साधी सोपी व्याख्या आहे.
परोपकार म्हणजे पुण्य आणि परपीडा म्हणजे पाप
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज!
मी जे काम करत आहे, ते अधिक सुंदर करणे,
अधिक व्यवस्थित करणे हाच माझा धर्म आहे.
तीच माझी पूजा आहे तीच माझी साधना आहे
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज!
आपल्या पुढे जे कर्तव्य असेल
त्याच्या सर्व बाजू व्यवस्थितपणे समजून घेणे
याचा अर्थ ब्रह्मज्ञान
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज!
माणूस जन्माला येणे आणि
माणूस बनणे दोन अत्यंत भिन्न गोष्टी आहेत
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज!
एकांत हा माणसाच्या विचाराला पुष्टी देणारा,
भावी परिस्थितीच स्वप्न दाखविणारा असतो
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज!
'ग्राम विकास' हेच राष्ट्र विकासाचे सूत्र
तुकडोजी महाराजांची ग्रामीण भारतावर विशेष श्रद्धा होती. त्यांच्या मते, देशाच्या प्रगतीचा मार्ग खेड्यांतून जातो. "भारत हा खेड्यांचा देश आहे. त्यामुळे देशाच्या विकासाचा विचार करताना ग्रामीण भारत विसरता कामा नये. ग्रामीण विकास वगळून राष्ट्र घडणार नाही," अशी त्यांची ठाम धारणा होती. समाजातील सर्व स्तरातील घटकांचा विकास व्हावा यासाठी ते विशेष आग्रही होते. याच विचारांमुळे त्यांनी संत गाडगेबाबा यांच्या समाजकार्यातही स्वतःला झोकून दिले. ग्रामीण भागाचा विकास झाला तरच देशाचा विकास होऊ शकेल, अन्यथा नाही, असा त्यांचा विश्वास होता.