काही वर्षांपूर्वी तुम्ही बिहार (Bihar) मधील रहिवासी दशरथ राम मांझी बद्दल ऐकले असेल, ज्यांनी डोंगर फोडून त्यातून रस्ता तयार केला. याच कारणस्तव आज लोक त्यांना बिहारचा ‘माउंटन मॅन’ म्हणून ओळखतात. आता अशीच एक घटना पुन्हा एकदा बिहारमधून आली आहे. बिहारमधील गया (Gaya) जिल्ह्यातील एका व्यक्तीने आपले कठोर परिश्रम व समर्पणाने हे सिद्ध केले की, जर हिम्मत असेल तर कोणतेही काम कठीण नाही. बिहारमधील गयापासून 80 किमी अंतरावर असलेल्या कोठिलवा (Kothilawa) गावात राहणारे 70 वर्षीय लौंगी भुईया (Laungi Bhuiyan) डोंगराळ रस्ता समतल करण्यासाठी 30 वर्षे परिश्रम घेतले आणि तीन किमी लांबीचा कालवा (Canal) बांधला.
आता या कालव्याद्वारे लोकांना सिंचनामध्ये अतिशय मदत होत असून, शेतात भरपूर पाणी मिळते. एकट्याने कालवा खोदण्याचे काम लौंगी भुईयांनी केले आहे. ते म्हणतात की, ‘खेड्यातील एका तलावात पाणी वाहून नेणारा हा कालवा खोदण्यास 30 वर्षे लागली.’ ते पुढे म्हणाले, ‘मागील 30 वर्षांपासून मी जवळच्या जंगलात जाऊन कालवा खोदत आहे. या कामात कोणीही मला सहकार्य केले नाही. गावकरी आता उपजीविकेसाठी शहराकडे जात आहेत, पण मी गावातच राहायचे ठरवले.'
एएनआय ट्वीट -
Bihar: A man has carved out a 3-km-long canal to take rainwater coming down from nearby hills to fields of his village, Kothilawa in Lahthua area of Gaya. Laungi Bhuiyan says, "It took me 30 years to dig this canal which takes the water to a pond in the village." (12.09.2020) pic.twitter.com/gFKffXOd8Y
— ANI (@ANI) September 12, 2020
माध्यमांच्या वृत्तानुसार, या कालव्याचा लाभ 3 गावांतील 3000 लोक घेत आहेत. पावसाळ्यात डोंगरावरून पडणारे पाणी थेट नदीत जात असे व याच गोष्टीचे भुईया यांना दुःख व्हायचे. हे पाणी शेतात येऊ शकले तर ग्रामस्थांना मदत होईल, असे त्यांना वाटले. हे लक्षात घेऊन त्यांनी कालवा खोदण्याचे काम सुरू केले.
तब्बत 30 वर्षांनतर त्यांचे स्वप्न साकार झाले. सोशल मीडियावरही लोक लौंगी भुईया यांची खूप प्रशंसा करत आहेत. तसेच बर्याच लोकांनी त्याला दुसरे दशरथ मांझी असे संबोधले आहे. दरम्यान, कोठिलवा गाव आजूबाजूच्या घनदाट जंगलांनी वेढलेले आहे. हे जिल्हा मुख्यालय गयापासून सुमारे 80 किमी अंतरावर आहे. हे गाव माओवाद्यांच्या आश्रयाचे ठिकाण आहे. या भागातील लोकांचे जगण्याचे मुख्य साधन म्हणजे शेती आणि पशुपालन आहे.