Sharad Pawar On Deepak Kesarkar: दीपक केसरकर यांच्या 'शिवसेना फोडली' वक्तव्यावर शरद पवार यांची प्रतिक्रीया, काय म्हणाले? जाणून
Sharad Pawar | (Photo Credits: ANI)

शिवसेना (Shiv Sena) जेव्हा जेव्हा फुटली तेव्हा प्रत्येक वेळी त्यापाठीमागे शरद पवार (Sharad Pawar) यांचाच हात होता असा आरोप करुन एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी खळबळ उडवून दिली. केसरकर यांच्या आरोपावरुन राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाने आक्रमक भूमीका घेत प्रतिक्रिया दिली. अजित पवार, जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी दीपक केसरकर यांना प्रत्युत्तर दिल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षेचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीच प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांनी नागपूर दौऱ्यावर असताना केसरकर यांच्या विधानाविषयी भाष्य केले. शरद पवार यांनी सांगितले की, फार महत्त्व द्यावे इतके केसरकर यांचे वक्तव्य नाही.

शरद पवार यांनी केसरकर यांच्याविषयी विचारलेल्या प्रश्नाला अगदीच मोजक्या शब्दांत उत्तर दिले. मात्र, केंद्र सरकारने संसदेत उच्चारल्या जाणाऱ्या शब्दांना असंसदीय ठरवणे आणि त्यावर एकप्रकारची बंदी घालणे. तसेज, संसद आवारात धार्मिक कृतींना मज्जाव करणे यांबाबत भाष्य केले. संसदेच्या कोणत्याही सभागृहात जर एखादी मागणी मान्य झाली नाही, सरकारने एखादे पाऊल चुकीचे टाकले तर सभागृहातील सदस्य संसदेच्या आवारात महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ शांततामय मार्गाने निदर्शने करतात. उपोषणही करतात. तो सदस्यांचा हक्क आणि अधिकार आहे. तो अधिकारच काढून घेतला जात असल्याचेही शरद पवार म्हणाले. (हेही वाचा, Jitendra Awhad On Deepak Kesarkar: जेवलात त्यातच थुंकायचे हे कुठून शिकलात? खाजवून खरूज काढू नका; जितेंद्र आव्हाड यांचा दीपक केसरकर यांना इशारा)

दरम्यान, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांबाबत बोलताना शरद पवार म्हणाले, या निवडणुका स्थानिक स्वराज्य सस्थांनी एकत्र येऊन लढाव्यात. हे तिन्ही पक्ष जर एकत्र येऊन लढले तर नागरिकांना त्यांच्या मनाप्रमाणे मतदान करता येणे शक्य होईल, असेही पवार म्हणाले. मात्र, आघाडीबाबत कोणत्याही एका पक्षाला निर्णय घेता येणार नाही. आम्हाला तिन्ही पक्षांनी एकत्र बसून निर्णय घ्यावा लागेल. त्यासाठी विविध बैठका घ्याव्या लागतील असेही ते म्हणाले.