Monsoon Update: मान्सून पुढील 48 तासांत दक्षिण अंदमानात होणार दाखल; हवामान विभागाची माहिती
Rain | Representative image (Photo Credit- Pixabay)

मान्सूनची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लोकांना हवामान विभागाकडून एक आनंदाची बातमी मिळाली आहे. नैऋत्य मान्सून पुढील 48 तासांत दक्षिण अंदमान समुद्र आणि आग्नेय बंगालच्या उपसागरातील काही भागात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने यासंदर्भातली माहिती दिली आहे. बुधवार 22 मे दरम्यान नैऋत्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यत असून हे क्षेत्र ईशान्यकडे सरकण्याची शक्यता असल्याचे देखील हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले आहे.  (हेही वाचा - Rain Alert: 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीस मनाई, अनेक जिल्ह्यात पावसाचा अलर्ट)

पाहा पोस्ट -

मान्सून साधारणपणे 1 जूनच्या आसपास केरळमध्ये दाखल होत असतो, परंतू यंदा मान्सून एक दिवस आधीच म्हणजे 31 मे  रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार आहे. यंदा देशात मान्सून सरासरी पेक्षा जास्त म्हणजेच 106 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. येत्या मान्सून हंगामात 'ला निना' परतणार  आहे.

IMD ने यापूर्वी 19 मे पर्यंत मान्सून दक्षिण अंदमान समुद्रात दाखल होण्याची शक्यता वर्तवली होती. यानंतर 31 मे पर्यंत मान्सून देशाचे प्रवेशद्वार असलेल्या केरळमध्ये पोहोचेल, अशी माहिती दिली आहे. IMD अंदमान आणि केरळ प्रदेशात मान्सूनच्या आगमनाचा अंदाज देत असताना, इतर राज्यांसाठी तारखांचा अंदाज देत नाही. डेटाच्या आधारे, मान्सूनच्या उत्तरेकडील प्रगतीचे मॅप केले जाते. त्यानुसार मान्सून 5 जून रोजी गोव्यात दाखल होऊन 6 जूनपर्यंत कोकणात पोहोचण्याची शक्यता आहे.