Rain Alert: 1 जून ते 31 जुलैपर्यंत मासेमारीस मनाई, अनेक जिल्ह्यात पावसाचा अलर्ट
Fishing Boat | Representational image (Photo Credits: pixabay)

राज्यात पुढील 2 दिवसांसाठी अनेक जिल्ह्यात पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. आता, मान्सूनपूर्व (Monsoon) पाऊसानंतर यंदा लवकरच मान्सूनची हजेरी लागणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे, पावसाळ्याच्या दृष्टीने तयारी करण्यात येत आहे. मच्छिमारांसाठी व नौका पर्यटकांसाठी काही महत्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, 1 ते 31 जुलै या कालावधीत 2 महिन्यांसाठी मासेमारी (Fishing) करण्यास मनाई करण्यात आली आहे. ( Heatwave Alert In India: UP-MP आणि बिहारसह 6 राज्यांमध्ये उष्णतेची लाट; तापमान 45 अंशांपर्यंत पोहोचण्याची शक्यता, IMD कडून अलर्ट जारी)

पावसाळी मासेमारी बंदी यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकांना लागू राहील. पावसाळी मासेमारी बंदी ही पारंपारिक पध्दतीने मासेमारी करणाऱ्या बिगर- यंत्रचालित नौकांना लागू राहणार नाही. समुद्रात मासेमारीसाठी गेलेल्या सर्व यांत्रिक व यंत्रचलित मासेमारी नौका दि. 01 जून 2024 पूर्वी मासेमारी बंदरात परतणे बंधनकारक आहे. तसेच दि. 31 जुलै 2024 वा त्यापुर्वी सदर नौकांना समुद्रात मासेमारीकरीता जाता येणार नाही. राज्याच्या सागरी जलधी क्षेत्राबाहेर (सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापुढे) खोल समुद्रात मासेमारीस जाणाऱ्या नौकांस केंद्र शासनाच्या खोल समुद्रातील मासेमारीबाबतचे धोरण / मार्गदर्शक सुचना/ आदेश लागु राहतील. पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौकेस अपघात झाल्यास अशा नौकेस शासनाकडून कोणत्याही प्रकारची नुकसान भरपाई मिळणार नाही.

राज्याच्या सागरी जलधी क्षेत्रात (सागरी किनाऱ्यापासुन 12 सागरी मैलापर्यंत) यंत्रचलित व यांत्रिक मासेमारी नौका पावसाळी मासेमारी बंदी कालावधीत मासेमारी करतांना आढळल्यास / केल्यास महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम (सुधारणा), 2021 च्या कलम 14 अन्वये नौका व नौकेवर बसविलेली उपसाधने व मासेमारी सामुग्री आणि त्यामध्ये सापडलेली मासळी जप्त करण्यात येईल तसेच कलम 17 मधील तरतुदी अन्वये जास्तीत जास्त कठोर शास्ती लादण्यात येईल.