 
                                                                 Cognizant WFO Policy: कोरोनानंतर आता बऱ्याच कंपन्यांनी आपली वर्क फ्रॉम होम (Work From Home) पॉलिसी बंद केली आहे. कर्मचाऱ्यांना कार्यालयात येऊन काम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आता आंतरराष्ट्रीय सॉफ्टवेअर कंपनी कॉग्निझंटने (Cognizant) आपल्या कामगारांना इशारा दिला आहे की, त्यांनी कार्यालयात परतण्याचे नियम न पाळल्यास त्यांना नोकरीवरून काढून टाकले जाऊ शकते. याआधीही कंपनीने कामगारांना कार्यालयात परतण्याचे स्मरणपत्र दिले होते. इतर काही सॉफ्टवेअर कंपन्यांनीही त्यांच्या कामगारांसाठी कार्यालयीन हजेरी अनिवार्य केली आहे.
कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना कार्यालयात परत येण्यासाठी अनेक वेळा सूचित केले आहे. याआधी कंपनीने आठवड्यातून 3 दिवस कामावर येण्याची सुविधा दिली होती, मात्र आता पूर्णपणे कार्यालयातून काम करण्याचा आदेश जारी केला आहे. कॉग्निझंटने 15 एप्रिल रोजी पाठवलेल्या मेलमध्ये असे सांगण्यात आले होते की, जे कर्मचारी वारंवार स्मरण देऊनही कार्यालयात कामावर येत नाहीत, त्यांना कामावरून काढून टाकण्यात येईल.
कंपनीने मीडिया रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, ‘कृपया लक्षात ठेवा की, कार्यालयात येऊन काम करण्याबाबतच्या सूचनांचे पालन करण्यात अयशस्वी झाल्यास कंपनीच्या धोरणांनुसार ते गैरवर्तन मानले जाईल आणि तुमच्या विरुद्ध योग्य शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.’ अशाप्रकारे कॉग्निझंटने आपल्या कर्मचाऱ्यांना धमकीवजा शब्दात सांगितले आहे की, त्यांच्या नोकऱ्या वाचवण्याची ही शेवटची संधी आहे. कंपनीच्या आदेशाचे पालन न केल्यास त्यांना कामावरून काढून टाकण्यात येईल.
कॉग्निझंटचे सीईओ रवी कुमार एस यांनी सांगितले होते की, देशातील सर्व सहयोगींनी आठवड्यातून तीन दिवस कार्यालयात असणे अपेक्षित आहे. कॉग्निझंटचे देशात सुमारे 2,54,000 कामगार आहेत. यापूर्वी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) आणि इन्फोसिस सारख्या मोठ्या सॉफ्टवेअर कंपन्यांनीही त्यांच्या कामगारांना कार्यालयात परतणे अनिवार्य केले होते. टीसीएसने व्हेरिएबल पे संबंधित पॉलिसी अपडेट करून, ऑफिसमधले काम अनिवार्य केले आहे. कंपनीचे तिमाही निकाल जाहीर झाल्यानंतर हे धोरण लागू करण्यात आले.
 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     QuickLY
                                                                                QuickLY
                                     Socially
                                                                                Socially
                                     
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                                                 
                     
                     
                     
                     
                                 
                                 
                                 
                                 
                                 
                                
