Pune Hording Collapse: घाटकोपरनंतर आता पुण्यात होर्डिंग कोसळले, अनेक गाड्यांचे नुकसान

मुंबईतील घाटकोपरची होर्डिंग पडल्याची घटना ताजी असताना आता पुण्यात देखील अशीच एक घटना घडली आहे. सुदैवाने यात कुणीही जखमी किंवा कोणतीही जीविहितहानी झालेली नाही. पिंपरी- चिंचवड शहरातील मोशी येथे रस्त्याच्या कडेला असणारे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. मोशीत दुपारी साडेचारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह शहरातील काही भागात पाऊस झाला त्यात सोसाट्याचा वारा आल्याने हे होर्डिंग थेट कोसळलं.  मोशीतील वादळी वाऱ्याने जय गणेश साम्राज्य चौक येथील रस्त्यालगत असलेले भले मोठे लोखंडी होर्डिंग कोसळले आहे. यात चार दुचाकी आणि टेम्पोच नुकसान झाल्याचं सांगितलं जात आहे.  (हेही वाचा - Ghatkopar Hoarding Collapse: घाटकोपर येथील होर्डिंग अपघातातील मृतांमध्ये Kartik Aaryan च्या नातेवाईकांचा समावेश; अंत्यसंस्काराला अभिनेत्याची उपस्थिती- Reports)

मुंबईतील होर्डिंग दुर्घटनेनंतर पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी आज पुण्यातील होर्डिंग्जची पाहणी केली आणि नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आलेल्या हार्डिंग्जवर कारवाई करण्याचे आदेश दिले . पुणे महापालिकेच्या हद्दीत दोन हजार एकोणपन्नास अधिकृत होर्डिंग्ज आहेत . या होर्डिग्जचे स्ट्रक्चरल ऑडिट महापालिकेकडून करण्यात येते . मात्र तरीही धोकादायक वाटणाऱ्या होर्डींग्जवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

मागील वर्षी एप्रिल महिन्यात अशाच प्रकारचं होर्डिंग कोसळल्याची घटना घडली होती. त्यात पाच जणांचा जीव गेला होता. त्यानंतर पिंपरी-चिंचवडच्या महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी अनधिकृत होर्डिंगची माहिती घेतली जात होती. मात्र त्यावर किती कारवाई केली याची कोणतीही माहिती समोर आली नाही.