महाराष्ट्रासमोर आता दुष्काळात तेरावा महिन्या येण्याची चिन्हे आहेत. राज्यात कोरोना व्हायरस अर्थातच कोविड 19 या साथिच्या आजाराने आव्हान दिले आहे. असे असतानाच राज्यातील विविध शहरांमध्ये ‘सिव्हिअरली अॅक्युट रेस्पायरेटरी इन्फेक्शन’ (Severe Acute Respiratory Infection) म्हणजेच 'सारी' (SARI) आजाराचे रुग्ण आढळून आले आहेत. औरंगाबाद, हिंगोली, पिंपरी चिंचवड आणि हिंगोली येथे सारी आजाराचे काही रुग्ण आढळून आले आहेत. सारी आणि कोरोना व्हायरस या दोन्ही आजारांची लक्षणं जवळपास सारखीच असल्याचे तज्ज्ञ सांगत आहेत.
हिंगोली येथे युवतीचा मृत्यू
हिंगोली शहरातील एका 19 वर्षिय मुलीचा सारी आजाराची लागण होऊन मृत्यू झाल्याची एक घटना पुढे आली आहे. या घटनेनंतर या युवतीच्या घरातील 8 जणांना हिंगोलीच्या जिल्हा रुग्णालयात आयसोलेशन वॉर्डात ठेवण्यात आले आहे. आयसोलेशनमध्ये असलेल्या आठही जणांच्या लाळेचे नमुने घेऊन ते चाचणीसाठी औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. (हेही वाचा, Health Tips: Quarantine च्या काळात 'अशा' पौष्टिक पदार्थांचा तुमच्या आहारात असावा समावेश, WHO ने केले मार्गदर्शन)
औरंगाबाद येथे 8 वर्षीय मुलाचा मृत्यू
दरम्यान, औरंगाबाद येथेही एका 8 वर्षीय मुलाचा सारी आजाराने काही दिवसांपूर्वीच मृत्यू झाला होता. या बालकाला सारी आजार झाल्याचे निदान झाले होते. त्याचा 24 मार्च 2020 या दिवशी मृत्यू झाला. त्यानंतर येथील 4 जणांवर रुग्णालयात उपचार सुरु करण्यात आले होते.
दरम्यान, प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, राज्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र आणि रुग्णालयांनी बाह्य व आंतर रुग्णांची सेवीअर अॅक्युट रिस्पायरेटरी इलनेस (सारी) तपासणी करावी, अशी सूचना राज्याच्या आरोग्य संचलनालयाने राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणेला दिल्या आहेत. सारी रुग्णांमध्ये सर्वसाधारणणे ३८ अंश सेल्सिअस ताप, खोकला, घशात खवखव, धाप लागणे वा श्वास घेण्यास त्रास होणे, अशी लक्षणं दिसतात.