प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याची काळजी घेण्यासाठी वेळच मिळत नाही. यामुळे नियमित चीडचीड होणे, लठ्ठपणा, मधुमेह यासारख्या विविध समस्या उद्भवतात. पण यापासून बचाव करण्यासाठी काही जण तंदुरुस्त राहण्यासाठी जिम, योगसाधना करतात. कारण शारीरिक, मानसिक आणि भावनिक विकास करणारे योग हे एक शास्त्र आरोग्यासाठी फार फायदेशीर ठरते. भारतीय संस्कृतीतील या प्राचीन विद्येचे महत्त्व आता जगाने मान्य केले आहे. याचा विद्येचे महत्त्व पटवून देण्यासाठी आणि ती जोपासण्यासाठी 1 फेब्रुवारीला सुर्यनमस्कार डे साजरा करण्यात येतो.

सूर्यनमस्कार करण्याची सर्वात उत्तम वेळ म्हणजे सकाळची वेळ. सकाळच्या वेळी रिकाम्या पोटी केलेले सूर्यनमस्कार आरोग्यासाठी अतिशय लाभदायी ठरतात. 12 वेगवेगळ्या आसनांपासून एक सूर्यनमस्कार होतो. अशाप्रकारे दिवसातून कमीत कमी दोन सूर्यनमस्कार घालणे शरीर-मनाला बळकटी देते. तर जाणून घ्या कोणते आहेत सूर्यनमस्काराचे 12 प्रकार आणि त्याचे फायदे काय आहेत.(Yoga Day: मनाला एकाग्र आणि बुद्धीला कुशाग्र करण्यास मदत करेल सूर्यनमस्कार, सांगतायत पंतप्रधान नरेंद्र मोदी Watch Video)

The 12 steps of the Surya Namaskar (Photo Credits: Wikimedia Commons)

>>नमस्कार मुद्रा

दोन्ही पाय एकमेकांना जोडलेले, पाठ सरळ, हात शरीराच्या बाजूला या स्थितीत योगा मॅटवर उभे राहा. त्यानंतर दीर्घ श्वास घेत दोन्ही हात उचलून एकमेकांना नमस्काराप्रमाणे जोडा.

>>हस्तोत्तानासन

दीर्घ श्वास घेऊन दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर न्या. हाताचे दंड कानाला चिकटलेले राहतील आणि हात जोडलेले असतील.

>>हस्तपादासन

श्वास सोडत पुढे झुका आणि हातांनी पाय पकडण्याचा प्रयत्न करा.

>>अश्व संचलनासन

दीर्घ श्वास घेत उजवा पाय मागे न्या. डोके वर नेत काहीसे मागे झुका.

>>अधो मुख श्वानासन

श्वास सोडत तुमचा डावा पाय मागे न्या आणि पार्श्वभाग वरच्या दिशेने नेत डोके खाली न्या. शरीराचा V शेप तयार होईल.

>>अष्टांग नमस्कार

अष्टांग नमस्कार म्हणजे तुमच्या शरीराच्या आठ अंगाचा स्पर्श जमिनीला करणे. पायाची बोटे, गुघडे, छाती, तळहात आणि हनुवटी जमिनीला टेकून आणि पार्श्वभाग व पोटाचा भाग जमिनीपासून काहीशा अंतरावर ठेवत अष्टांग नमस्कार घाला.

>>भुजंगासन

श्वास घेत भुजंगासनात या. शरीराचा खालचा भाग जमिनीवर टेकवत आणि पुढचा भाग हातांच्या आधारे वर उचलत मान मागे झुकवा.

>>अधो मुख श्वानासन

श्वास सोडत अधो मुख श्वानासन करा. पुन्हा एकदा शरीर V शेपमध्ये आणा.

>>अश्व संचलनासन

दीर्घ श्वास घेत उजवा पाय पुढे आणा.

>>हस्तपादासन

त्यानंतर डावा पाय पुढे आणा. तुम्ही हस्तपादासनाच्या स्थितीत याल.

>>हस्तोत्तानासन

दोन्ही हात डोक्याच्या दिशेने मागे नेत काहीसे मागे झुका.

>>नमस्कार मुद्रा

मागे नेलेले हात पुढे आणत नमस्कार मुद्रा धारण करा.

सूर्यनमस्काराचे फायदे

सूर्यनमस्काराचे असंख्य फायदे आहेत. सूर्यनमस्कारामुळे स्नायू मजबूत होतात. हाडांना बळकटी येते. शरीर रिलॅक्स होण्यास मदत होते. वजन कमी करण्याच्या दृष्टीनेही सूर्यनमस्कार फायदेशीर ठरतात. फुफ्फुसांची कार्यक्षमता वाढते. मेटॅबॉलिजम (Metabolism) सुधारते. मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते. त्याबरोबर मनाची एकाग्रता वाढते. तर महिलांनी जर नियमित सूर्यनमस्कार घातल्यास त्यांना सतावणाऱ्या मासिक पाळीसंबिधत अनेक समस्या दूर होतात.