Toll Plaza | Image used for representational purpose only. | (Photo Credits: Wikimedia )Commons

देशभरातील राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाके (Toll Plazas) हटवले जाणार आहेत. मात्र, टोल टॅक्समध्ये कोणतीही सवलत मिळणार नाही. केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार नॅशनल हायवेवरून टोल काढून टाकेल आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकॉन्सिलिएशन कॅमेऱ्यातून टोल वसूल करेल. हे कॅमेरे वाहनांच्या क्रमांकाची नोंद करतील आणि कराचे पैसे वाहन मालकाच्या खात्यातून कापले जातील. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी सांगितले की, याबाबत पायलट प्रोजेक्ट सुरू आहे.

ही गोष्ट सुलभ करण्यासाठी कायदेशीर सुधारणा करण्याची गरज असल्याचेही गडकरी म्हणाले. मात्र, याबाबत अजूनही अनेक शंका असून, त्या केंद्राला सोडवाव्या लागणार आहेत. गडकरी म्हणाले की, 2019 मध्ये एक नियम करण्यात आला होता, त्यानुसार कंपनीने बसवलेल्या नंबर प्लेटसहच गाड्या येत आहेत. गेल्या चार वर्षांत आलेली सर्व वाहने ही नंबर प्लेटसह आली आहेत. आता टोलनाके हटवून कॅमेरे बसवण्याची योजना असल्याने, कॅमेरा या नंबर प्लेट्स सहज वाचेल आणि थेट खात्यातून टोल कापला जाईल. ज्या वाहनांवर अशी नंबर प्लेट नाही, त्यांना ती लावावी लागणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

गडकरी म्हणाले की, टोल न भरणाऱ्यांना शिक्षा कशी करायची हा एक प्रश्न सध्या समोर येत आहे. वाहनधारकाला दंड करण्याची तरतूद नाही. ते कायदेशीर कक्षेत आणण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. केंद्रीय मंत्री म्हणाले की, देशातील रस्ते आणि महामार्ग सुधारण्यासाठी सातत्याने काम केले जात आहे. एक्स्प्रेस वे तयार केले जात आहेत, ज्यामुळे प्रवासादरम्यानचा वेळ वाचू शकेल. केंद्र सरकार 2024 पर्यंत देशात 26 हरित द्रुतगती मार्ग बांधणार आहे, ज्यामुळे मोठ्या शहरांमधील प्रवासाचा वेळ कमी होईल. (हेही वाचा: सुरक्षित ऑनलाईन व्यवहारांसाठी क्रेडिट,डेबिट कार्ड्स टोकनाईज्ड करण्याची अंतिम मुदत पुढील महिन्यापर्यंतच; इथे पहा सारी माहिती)

दरम्यान, सध्या सुमारे 40,000 कोटी रुपये टोल टॅक्स म्हणून जमा केले जातात, त्यापैकी सुमारे 97 टक्के FASTag द्वारे केले जात आहेत. FASTag असलेल्या वाहनाकडून टोल टॅक्स वसूल करण्यासाठी सुमारे 47 सेकंद लागतात. एका तासात 112 वाहनांचा टोल टॅक्स मॅन्युअली केला जातो, तर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून 260 हून अधिक वाहनांकडून टोल वसूल केला जातो.