Coronavirus | Image Used For Representational purpose Only | (Photo Credits: Pixabay.com)

कोरोना विषाणूच्या (Coronavirus) संभाव्य चौथ्या लाटेच्या काळात बिहारमध्ये (Bihar) पुन्हा एकदा या साथीचे नवीन रूप समोर आल्याने खळबळ उडाली आहे. आयजीआयएमएस (IGIMS) पटना, येथे जीनोम सिक्वेन्सिंगमध्ये कोरोनाचा धोकादायक नवीन प्रकार BA.12 ची पुष्टी झाली आहे. मायक्रोबायोलॉजी विभागाच्या एचओडी डॉ. नम्रता कुमारी यांच्यामते, हॉस्पिटलमध्ये दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा जीनोम सिक्वेन्सिंग सुरू झाली आहे आणि यासाठी एकूण 13 नमुन्यांची चाचणी झाली. यापैकी 12 नमुन्यांमध्ये BA 2 आढळला आहे, तर एका नमुन्याच्या अहवालात BA.12 आढळून आला आहे.

या नवीन प्रकाराबद्दल बोलताना डॉ. नम्रता म्हणाल्या की, या नवीन व्हेरिएंटची संसर्ग क्षमता उर्वरित ओमिक्रॉनच्या तुलनेत अनेक पटीने जास्त आहे. हा प्रकार पहिल्यांदा अमेरिकेत आढळून आला होता. गेल्या 2 महिन्यांपासून या हॉस्पिटलमध्ये जीनोम सिक्वेन्सिंग थांबवण्यात आले होते, पण दिल्लीसह 5 राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढू लागताच, बिहारमध्ये नमुन्याची चाचणी वाढली आणि जीनोम सिक्वेन्सिंग सुरू झाले.

बिहारमधील आरोग्य विभाग चौथ्या लाटेबाबत पूर्णपणे सतर्क आहे आणि सर्व सार्वजनिक ठिकाणी बाहेरून येणाऱ्या लोकांची तपासणी केली जात आहे. पाटणा विमानतळावरही 4 टीम तैनात करण्यात आल्या आहेत, तर रेल्वे स्थानक, बस स्टॉपवरही कोरोनाची तपासणी सुरू झाली आहे. आतापर्यंत बिहारमधील सुमारे 25 रुग्णांमध्ये कोरोनाची पुष्टी झाली आहे, तरीही आरोग्य विभागाने अद्याप नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केलेली नाहीत. (हेही वाचा: भारतात गेल्या 10 वर्षांत असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे 17 लाखांहून अधिक लोकांना HIV ची लागण; महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर)

दुसरीकडे, सर्व जिल्हा प्रशासन लसीकरण आणि चाचणीबाबत जागरुक असून सर्व जिल्ह्यांमध्ये लसीकरणाचा वेग पुन्हा एकदा आला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता IGIMS मध्ये कोरोनाचा अहवाल पाहूनच ओपीडी आणि इमर्जन्सीमध्ये उपचार केले जात आहेत. दरम्यान, BA.12 व्हेरिएंट हा प्रकार चौथ्या लाटेच्या दृष्टीने अतिशय धोकादायक मानला जात आहे. एका अंदाजानुसार, हा प्रकार मागील Omicron प्रकारापेक्षा 10 पट अधिक धोकादायक असल्याचे म्हटले जात आहे, परंतु या प्रकाराचा भारतावर कसा परिणाम होईल याचा कोणताही पुरावा सध्या उपलब्ध नाही.