असुरक्षित संभोगामुळे (Unprotected Sex) गेल्या 10 वर्षांत देशात 17 लाखांहून अधिक लोकांना एचआयव्हीची (HIV) लागण झाली आहे. राष्ट्रीय एड्स कंट्रोल ऑर्गनायझेशनने आरटीआय प्रश्नाला उत्तर देताना दिलेल्या आकडेवारीमधून ही बाब समोर आली आहे. गेल्या 10 वर्षांत एचआयव्ही संक्रमित लोकांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे. 2011-12 मध्ये 2.4 लाख लोकांमध्ये असुरक्षित लैंगिक संबंधातून एचआयव्ही प्रसारित झाल्याची नोंद झाली, तर 2020-21 मध्ये ही संख्या 85,268 इतकी कमी झाली.
मध्य प्रदेशातील कार्यकर्ते चंद्र शेखर गौर यांनी दाखल केलेल्या आरटीआय प्रश्नाला उत्तर देताना, राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्था (NACO) ने सांगितले की भारतात 2011-2021 दरम्यान असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे 17,08,777 लोकांना एचआयव्ही झाला. राज्यांबद्दल बोलायचे झाले तर, आंध्र प्रदेशमध्ये सर्वाधिक 3,18,814 एचआयव्ही संक्रमणाची प्रकरणे नोंदवली गेली, त्यानंतर महाराष्ट्रात 2,84,577, कर्नाटकात 2,12,982, तामिळनाडू 1,16,536, उत्तर प्रदेश 1,10,911 आणि गुजरातमध्ये 87,440 प्रकरणे समोर आली.
तसेच, 2011-12 ते 2020-21 या कालावधीत 15,782 लोकांना रक्त आणि रक्त उत्पादनाच्या संक्रमणाद्वारे एचआयव्हीचा संसर्ग झाला आणि 18 महिन्यांच्या अँटीबॉडी चाचणी डेटानुसार 4,423 लोकांना हा आजार आईकडून बाळाला मिळाला. सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये, एचआयव्ही प्रसारित होण्याच्या प्रकरणांमध्ये सातत्याने घट झाल्याचे डेटामध्ये म्हटले आहे. 2020 पर्यंत, देशात 81,430 मुलांसह 23,18,737 लोक एचआयव्ही सह जगत आहेत.
पूर्व-चाचणी/चाचणीनंतरच्या समुपदेशनाच्या वेळी एचआयव्ही पॉझिटिव्ह व्यक्तींनी दिलेल्या प्रतिसादावरून समुपदेशकाने एचआयव्हीच्या प्रसाराच्या पद्धतींची माहिती नोंदवली आहे, त्यामुळे डेटा स्वत:च नोंदवला जातो, असे आरटीआय अर्जात म्हटले आहे. एचआयव्ही शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करतो. एचआयव्हीवर उपचार न केल्यास एड्स होऊ शकतो.
एचआयव्ही संसर्गाच्या काही आठवड्यांच्या आत, ताप, घसा खवखवणे आणि थकवा यासारखी फ्लूसारखी लक्षणे दिसू शकतात. एड्सच्या लक्षणांमध्ये वजन कमी होणे, ताप किंवा रात्री घाम येणे, थकवा आणि वारंवार होणारे संक्रमण यांचा समावेश होतो. एचआयव्हीवर प्रभावी उपचार नाही. मात्र योग्य त्या वैद्यकीय मदतीने तो व्यवस्थापित केला जाऊ शकतो. सतीश कौल, डायरेक्टर, इंटरनल मेडिसिन, फोर्टिस मेमोरियल रिसर्च इन्स्टिट्यूट, गुरुग्राम म्हणाले की, गेल्या एका दशकात भारतात एचआयव्हीची स्थिती स्थिर होत आहे. (हेही वाचा: दिल्लीमध्ये पुन्हा वाढत असलेल्या करोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मास्क वापरणे केले बंधनकारक)
भारतात NACO चे खूप चांगले नेटवर्क आहे, ही एक भारत सरकारची संस्था आहे, जी एचआयव्ही रुग्णांना त्याच्या निदानापासून व्यवस्थापित करण्याची जबाबदारी घेते. 2000 पासून एचआयव्ही बाधित रुग्णांचे प्रमाण कमी होत चालले आहे. मात्र जर एखाद्या व्यक्तीची एचआयव्ही चाचणी पॉझिटिव्ह आली, तर त्याने शक्य तितक्या लवकर अँटीरेट्रोव्हायरल थेरपी (ART) सुरू करावी, असे सांगितले जाते.