
टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) कंपनीने खर्च कपात करण्याच्या उपाययोजनांअंतर्गत आपल्या एकूण कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 2 टक्के म्हणजेच सुमारे 12,000 कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दीर्घकालीन दृष्टिकोनातून कंपनीसाठी नकारात्मक ठरू शकतो, असे 'जेफरीज'च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. अहवालात सांगण्यात आले आहे की, वाढती आर्थिक आव्हाने आणि सतत दबावाखाली असलेली वाढ लक्षात घेता, नफा टिकवून ठेवण्यासाठी TCS आता अधिक लक्ष देत आहे. गेल्या तीन महिन्यांत ही तिसरी मोठी खर्च कपात करणारी कारवाई आहे.
'बेंचिंग' धोरण लागू
यापूर्वी एप्रिल 2025 मध्ये वेतनवाढ पुढे ढकलण्यात आली होती आणि जून 2025 मध्ये नवे 'बेंचिंग' धोरण लागू करण्यात आले होते. या नव्या धोरणानुसार, एखाद्या कर्मचाऱ्याचा 'नॉन-बिलेबल' कालावधी वर्षात केवळ 35 दिवसांपुरता मर्यादित केला आहे.
कंपनीवर वाढत्या आर्थिक दबाव
'जेफरीज'ने म्हटले आहे की, “खर्च कपात केंद्रस्थानी ठेवण्याची TCS ची भूमिका दीर्घकालीन दृष्टीने हानिकारक ठरू शकते. कंपनीवर वाढत्या आर्थिक दबावाचा परिणाम होत आहे.” अहवालानुसार, TCS नेहमीच आयटी क्षेत्रातील टॉप पेमास्टर्सपैकी एक नव्हती, मात्र दीर्घकालीन करिअर संधी आणि नोकरीतील स्थैर्य यावर भर देऊन तिने तुलनेत कमी कर्मचारी घसरण (Attrition) राखली आहे.
कर्मचाऱ्यांच्या मनोबलावर परिणाम
तरीसुद्धा, सध्याची कर्मचाऱ्यांची कपात त्यांच्या मनोबलावर परिणाम करू शकते आणि त्याचा कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. दीर्घकालीन दृष्टीने बघितले असता, ही धोरणे Cognizant कंपनीप्रमाणे 2020 ते 2022 दरम्यान मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीस कारणीभूत ठरू शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे.
TCS मधील कर्मचाऱ्यांच्या कपातीचा परिणाम मुख्यतः कंपनीवरच मर्यादित असला, तरी आयटी क्षेत्रातील एकूण 'नेट हायरींग' FY22 पासून कमकुवतच राहिलेला आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे मागणीतील घट कायम राहणे. आयटी कंपन्यांमध्ये नवीन करार जिंकण्यासाठी खर्च कपात हे एक महत्त्वाचे परिमाण बनले आहे. ग्राहक आता उत्पादनक्षमतेत सुधारणा अपेक्षित करत आहेत.
आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वाढता वापर
यामागील आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) तंत्रज्ञानाचा वाढता वापर. हे तंत्रज्ञान कंपन्यांना कमी कर्मचार्यांमध्ये जास्त काम करण्यास सक्षम बनवत आहे किंवा समान कर्मचार्यांद्वारे अधिक काम साध्य करण्यास मदत करत आहे. कमकुवत मागणीच्या काळात कर्मचाऱ्यांना नव्या प्रकल्पांमध्ये पुन्हा सामावून घेण्यास वेळ लागतो, त्यामुळे कर्मचाऱ्यांची कपात अनिवार्य ठरते.
अहवालात नमूद करण्यात आले आहे की, जेथे वाढीचा वेग मंदावला आहे अशा कंपन्या सध्या उच्च 'युटिलायझेशन रेट' (Utilization Rate) वर कार्यरत आहेत आणि त्यामुळे त्यांच्या 'बेंचेस' मर्यादित आहेत. दुसरीकडे, ज्या कंपन्यांमध्ये वाढीचा दृष्टीकोन मजबूत आहे, त्या कंपन्या तुलनेत कमी 'युटिलायझेशन रेट'सह काम करत आहेत.