Hope Mars Mission: UAE ठरला मंगळ ग्रहावर यान धाडणारा पहिला मुस्लीम देश; 200 दिवसांनी करणार मंगळाच्या कक्षेत प्रवेश (Watch Video)
Hope Mars Mission By UAE (Photo Credits: Twitter)

UAE's Hope Mars Mission: संयुक्त अरब अमिरात म्हणजेच युएईने (UAE) आज जपान (Japan) च्या 'Tanegashima Space Center' येथुन मंगळ यानाचे प्रक्षेपण केले आहे. 1. 3 टन वजनाचे हे यान पुढील 200 दिवसात 50 कोटी किमीचा प्रवास करत युएईचे यान Hope हे मंगळ ग्रहाच्या कक्षेत प्रवेश करणार आहे. 2021 च्या फ्रेब्रुवारी महिन्यामध्ये हे यान मंगळाच्या कक्षेत प्रवेश करेल व पुढे तेथील हवामान आणि वातावरणातील बदलांसंदर्भात अभ्यास करेल असे सांगण्यात आले आहे. हे यान म्हणजे उमेद आणि मानवतेचे प्रतिक असल्याचे युएईने म्हटलं आहे. यासोबतच मंंगळावर यान धाडणार्‍या देशांच्या यादीत युएई हा पहिला मुस्लीम देश ठरला आहे.

प्राप्त माहितीनुसार, ‘होप मार्स मिशन’ अंतर्गत मंगळाचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या यानाचे जपानमधील तानेगाशिमा येथील लाँच पॅडवरुन यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं. या मोहिमेच्या माध्यमातून पहिल्यांदाच एक हवामानासंदर्भात अभ्यास करणारा उपग्रह मंगळावर पाठवण्यात आला आहे मंगळावरील हवा, पाण्याचा अंश आणि मातीचा अभ्यास या उपग्रहामार्फत केला जाणार आहे.

Hope Mars Mission Launching Video

दरम्यान, होप मिशनच्या माध्यमातून एक हजार जीबीहून अधिक नवीन माहिती मिळणार असल्याची शक्यता संशोधकांनी व्यक्त केली आहे. ही माहिती जगभरातील वेगवेगळ्या देशांच्या २०० हून अधिक वैज्ञानिकांना अभ्यासासाठी मोफत देण्यात येणार आहे. पृथ्वीचे भविष्य काय असेल आणि मंगळावर मानवाला राहता येईल का या प्रश्नांना उत्तर शोधण्यासाठी महत्वाची माहिती या मोहिमेतून मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.