Screening for coronavirus | Representational image | (Photo Credits: PTI)

पुणे महानगरपालिकेने (PMC) कोरोना विषाणू पॉझिटिव्ह रूग्णांसाठी एंड्रॉइड बेस्ड ॲप्लिकेशन लाँच केले आहे. हे ॲप्लिकेशन अशा रुग्णांना फायद्याचे ठरणार आहे ज्यांनी घरीच आयसोलेशनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला आहे. पीएमसी होम आयसोलेशन अ‍ॅप (PMC Home Isolation APP) असे याचे नाव असून, हे रूग्णांना त्यांच्या रोजच्या आरोग्याविषयी पीएमसीशी संवाद साधण्यासाठी आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत ताबडतोब मदत मिळवण्यासाठी उपयुक्त ठरेल. ॲपचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विधानभवन (कौन्सिल हॉल) येथे झाला. गृह विलगिकरणात असलेल्या कोरोना बाधित रुग्णांच्या वापरासाठी व त्यांच्या आरोग्याच्या उपचारावर लक्ष ठेवण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या वतीने हे ॲप विकसित करण्यात आले आहे.

या ॲपचा निश्चित चांगला उपयोग होणार असून, गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या तब्येतीवर आरोग्य विभागाला लक्ष ठेवण्यासाठी याचा चांगला उपयोग होणार असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी यावेळी दिली.

ॲपची वैशिष्ट्ये -

  • ताप, पल्स, ऑक्सिजन, खोकला, सर्दी, थकवा, रक्तदाब, मधुमेह इत्यादी गोष्टींचे मूल्यांकन घरी विलगीकरण केलेला रुग्ण स्वतः ॲपद्वारे साध्या क्लिकद्वारे करू शकतो.
  • स्वतः च्या मदतीसाठी रुग्ण आपत्कालीन सतर्कता संदेश पाठवू शकतो, जो संदेश प्रभागनिहाय हेल्पलाईन क्रमांकावर पोहोचेल. तसेच रुग्णाला विलगीकरण वैद्यकीय किट मागवता येईल.
  • या ॲपच्या प्रभागनिहाय डॅशबोर्डवर तसेच मुख्यालयातील वॉररूममध्ये एकत्रित डॅशबोर्डवर ऑक्सिजन, ताप इत्यादी सारख्या रुग्णाच्या लक्षणांवर व आरोग्याच्या स्थितीवर निरीक्षण करण्याची सुविधा उपलब्ध आहे. (हेही वाचा: Coronavirus in Maharashtra: रुग्णांसाठी बेड नाही हे उत्तर सहन करणार नाही- राजेश टोपे)
  • ज्या रुग्णांकडे स्मार्टफोन नाही, त्यांचे आप्तजन आरोग्य विषयक माहिती पाठवू शकतात.

या अ‍ॅपवर नावनोंदणीच्या प्रक्रियेसाठी रुग्णास घराचे लोकेशन प्रविष्ट करणे गरजेचे आहे. यासेच आरटी-पीसीआरसह रुग्णाची सर्व माहिती भरली जावी. जर कुटुंबातील अजून कोणी कोविड पॉझिटिव्ह असेल, तर त्याच्या फोनवरून त्याची स्वतंत्र नोंदणी करणे आवश्यक आहे. वेगळा फोन उपलब्ध नसल्यास ‘अ‍ॅड’ बटणाचा वापर करून एकाच फोनमध्ये एकाधिक रुग्णांची नोंदणी केली जाऊ शकते. या अ‍ॅपद्वारे रुग्णाला रोज त्याच्या तब्येतीची माहिती देणे आवश्यक आहे.