कोरोना विषाणू महामारीनंतर 2 वर्षांनी मुंबईमध्ये टाटा मुंबई मॅरेथॉनचे (Tata Mumbai Marathon) 18 वे एडिशन होऊ घातले आहे. मुंबईत 15 जानेवारी रोजी होणाऱ्या 'ड्रीम रन'मध्ये आंतरराष्ट्रीय धावपटू, व्यावसायिक खेळाडू आणि उत्साही नागरिकांव्यतिरिक्त, ग्रामीण महाराष्ट्रातील विविध भागांतील 20 महिला सरपंचांचा सहभाग दिसेल. दोन स्वयंसेवी संस्थांच्या या अभिनव उपक्रमाचा उद्देश स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडून आलेल्या प्रतिनिधींमार्फत शिक्षण, प्रशिक्षण आणि सक्षमीकरणाविषयी जागरूकता पसरवणे हा आहे.
ऑलिम्पियन आणि माजी आशियाई चॅम्पियन गोपी टी आणि 4 वेळा मॅरेथॉन विजेती सुधा सिंग या मॅरेथॉनमध्ये भारताचे नेतृत्व करतील. तसेच गतविजेता श्रीनू बुगाथा, कालिदास हिरवे आणि राहुल कुमार पाल (2019 पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन चॅम्पियन) हे स्टार्ट लाईनवर उतरतील. ऑलिम्पियन आणि अर्जुन पुरस्कार विजेती सुधा सिंग तिच्या पाचव्या भारतीय एलिट महिला विजेतेपदासाठी प्रयत्न करणार आहेत आणि 2019 आणि 2017 मधील मुंबई मॅरेथॉनची रनर-अप धावपटू जिग्मेट डोल्मा तिला आव्हान देईल. (हेही वाचा: हॉकी विश्वचषकाला शुक्रवारपासुन होणार सुरवात, जाणून घ्या सामन्याचा आनंद कधी, कुठे आणि कसा घ्याल)
हाफ मॅरेथॉन प्रकारात 2016 चे विजेते दीपक कुंभार आणि गतविजेती पारुल चौधरी अनुक्रमे पुरुष आणि महिला क्षेत्राचे नेतृत्व करतील. पूर्ण मॅरेथॉन विजेते भारतीय पुरुष आणि महिलांना प्रत्येकी 5,00,000 रुपये मिळतील, याशिवाय प्रोत्साहन म्हणून 1,50,000 कोर्स रेकॉर्ड बोनसही मिळेल. फुल मॅरेथॉनचा मार्ग सीएसएमटीपासून सुरू होऊन शहराच्या मध्यभागातून जाईल, तर हाफ मॅरेथॉन माहीम दर्ग्यापासून सुरू होईल. दोन्ही शर्यतींचे मार्ग वांद्रे-वरळी सीलिंक, महालक्ष्मी रेसकोर्स, हाजी अली, पेडर रोड, बाबुलनाथ मंदिर आणि चौपाटी ओलांडून आझाद मैदानावर संपतील.
दरम्यान, येत्या रविवारी होणाऱ्या टाटा मुंबई मॅरेथॉन 2023 साठी पश्चिम रेल्वेने 15 जानेवारीच्या पहाटे दोन अतिरिक्त विशेष स्लो लोकल चालवण्याचा निर्णय घेतला आहे. विरार ते चर्चगेट आणि चर्चगेट ते वांद्रे अशा या गाड्या धावतील.