
अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने देशभरात बुद्धिबळ खेळावर तात्काळ बंदी घातली असून, या निर्णयामागे धार्मिक कारणे आणि इस्लामिक कायद्यानुसार जुगाराशी होणाऱ्या संभाव्य संबंधांचा हवाला देण्यात आला आहे. तालिबानच्या क्रीडा संचालनालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ही बंदी लागू झाल्याचे रविवारी स्पष्ट केले. तालिबान सरकार सर्व खेळ व मनोरंजनाचे आयोजन शरिया कायद्याच्या चौकटीत बसवण्याच्या दिशेने काम करत आहे.
सरकारी क्रीडा विभागाचे प्रवक्ते अतल मशवानी यांनी सांगितले की, शरिया कायद्यानुसार बुद्धिबळ हा जुगाराचा प्रकार मानला जातो. 'शरिया कायद्यानुसार बुद्धिबळ हा जुगाराचा माध्यम मानला जातो, जो की ‘सदाचाराचा प्रचार व कुकृत्यांचा प्रतिबंध’ या कायद्यानुसार पूर्णपणे निषिद्ध आहे,' असे त्यांनी स्पष्ट केले.
मशवानी यांनी सांगितले की, हा निर्णय केवळ धार्मिक कारणांवर आधारित आहे. “बुद्धिबळ या खेळाबाबत धार्मिक दृष्टिकोनातून काही चिंता आहेत. त्या पूर्णपणे दूर होईपर्यंत ही बंदी कायम राहील,” असे ते म्हणाले.
स्थानिकांवर याचा काय परिणाम होणार?
तालिबानच्या निर्णयामुळे काबूलमधील अनेक बुद्धिबळप्रेमी आणि छोटे व्यावसायिक चिंतेत आहेत. काबूलमधील एका कॅफेचे मालक अजीझुल्ला गुलझादा यांनी सांगितले की, त्यांच्या कॅफेमध्ये गेल्या काही वर्षांपासून अनौपचारिक बुद्धिबळ स्पर्धा घेतल्या जात होत्या आणि त्या खेळांमध्ये कुठलाही जुगार नव्हता.
'इतर अनेक इस्लामिक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर बुद्धिबळ खेळणारे खेळाडू आहेत,' असे गुलझादा यांनी AFP शी बोलताना सांगितले. त्यांनी ही बंदी मान्य असल्याचे जरी म्हटले तरी त्यामुळे त्यांचा व्यवसाय आणि खेळप्रेमींवर परिणाम होणार असल्याचे मान्य केले. तरुणांकडे आजकाल फारशा करमणुकीच्या गोष्टी उरलेल्या नाहीत. आमच्याकडे दररोज अनेक तरुण यायचे, असे ते म्हणाले. ते येथे चहा प्यायचे आणि मित्रांसोबत बुद्धिबळाच्या डावात आपले कौशल्य आजमवायचे.
खेळांवरील आधीचे निर्बंध
तालिबान सरकारने यापूर्वीही अफगाणिस्तानमध्ये विविध खेळांवर निर्बंध लावले आहेत. विशेषतः महिलांसाठी खेळांमध्ये सहभागी होण्यावर जवळपास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.
मागील वर्षी सरकारने मिश्र मार्शल आर्ट्स (MMA) सारख्या फ्री फायटिंगवर बंदी घातली होती. या खेळाला 'अती हिंसक' आणि 'शरिया कायद्याशी विसंगत' असे म्हटले गेले होते.
आता बुद्धिबळावर आलेली बंदी ही अफगाणिस्तानमधील सांस्कृतिक आणि करमणुकीसाठी मिळणाऱ्या पर्यायांच्या कमी होत चाललेल्या संधींचा आणखी एक नमुना आहे.