SuryaKumar Yadav (Photo Credit - X)

IND vs SL T20I Series 2024: भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यात शनिवारी तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिला सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाचा नवनियुक्त कर्णधार सूर्यकुमार यादव (SuryaKumar Yadav) याने खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटचे कर्णधारपद मिळण्याबाबत मत व्यक्त केले. सूर्यकुमार म्हणाला की त्याला मैदानावर नेतृत्त्व करताना खूप आनंद झाला आणि गेल्या काही वर्षांत वेगवेगळ्या कर्णधारांच्या हाताखाली खेळताना खूप काही शिकले. भारतीय संघ टी-20 वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर रोहित शर्माने (Rohit Sharma) सर्वात लहान फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. यानंतर त्याच्या जागी सूर्यकुमारला कर्णधार बनवण्यात आले. याआधी टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा दावेदार मानल्या जाणाऱ्या हार्दिक पांड्यापेक्षा (Hardik Pandya) त्याला प्राधान्य देण्यात आले.

श्रीलंका दौऱ्यापासून करणार आपल्या नव्या भूमिकेची सुरुवात

सूर्यकुमार आता श्रीलंका दौऱ्यापासून आपल्या नव्या भूमिकेची सुरुवात करणार आहे. सूर्यकुमारने यापूर्वीही अनेक वेळा संघाचे नेतृत्व केले आहे. नवा कर्णधार सूर्यकुमार आणि नवे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या उपस्थितीत भारतीय टी-20 संघ एका नव्या युगाची सुरुवात करणार आहे. सूर्यकुमार 2014 मध्ये गंभीरच्या नेतृत्वाखाली आयपीएलमध्ये कोलकाता नाइट रायडर्स (KKR) कडून खेळला आहे आणि दोघांचे एकमेकांशी खूप चांगले संबंध आहेत. (हे देखील वाचा: IND vs SL 1st T20I Pitch Report: पल्लेकेले स्टेडियमच्या खेळपट्टीवर कोणाला मिळणार मदत फलंदाज की गोलंदाज? येथे जाणून घ्या खेळपट्टीचा अहवाल)

गंभीरसोबतच्या नात्यावर सूर्यकुमार काय म्हणाला?

सूर्यकुमारने बीसीसीआय टीव्हीशी बोलताना सांगितले की, मी कर्णधार नसलो तरी मैदानावरील नेत्याची भूमिका मला नेहमीच आवडते. वेगवेगळ्या कर्णधारांकडून मी नेहमीच खूप काही शिकलो आहे. ही एक चांगली भावना आणि मोठी जबाबदारी आहे. हे नाते खूप खास आहे कारण मी 2014 मध्ये गंभीर यांच्या नेतृत्वाखाली केकेआरकडून खेळलो आहे. हे विशेष कारण मला तिथेच संधी मिळाली. आमचे नाते अजूनही मजबूत आहे. गंभीर यांना माहीत आहे की, मी सराव सत्राला आल्यावर मी कसे काम करतो आणि माझी मानसिकता काय असते. प्रशिक्षक म्हणून ते कसा प्रयत्न करतात हेही मला माहीत आहे. हे सर्व आमच्यातील प्रेमळ नातेसंबंधांवर आधारित आहे आणि ते कसे वाढते हे पाहण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.

कर्णधार म्हणून त्याला नम्र राहायचे आहे...

सूर्यकुमार म्हणाला की एक कर्णधार म्हणून त्याला नम्र राहायचे आहे कारण तो क्रिकेटला फक्त एक खेळ म्हणून पाहतो, जीवनाचा मार्ग म्हणून नाही. तो म्हणाला, या खेळातून मी शिकलो सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादी गोष्ट मिळवल्यानंतर किंवा चांगली कामगिरी न केल्यानंतरही तुम्ही किती नम्र राहता. मी शिकलो आहे की तुम्ही मैदानावर जे काही करता ते तिथेच सोडले पाहिजे. हे तुमचे जीवन नाही, तुमच्या जीवनाचा एक भाग आहे. जीवनात संतुलन निर्माण करणे महत्त्वाचे आहे. जर तुम्ही चांगली व्यक्ती असाल तर सर्व काही चांगले आहे.