Devajit Saikia (Photo Credit - X)

BCCI New Secretary: 12 जानेवारी रोजी होणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) विशेष सर्वसाधारण सभेत (SGM) देवजीत सैकिया (Devajit Saikia) आणि प्रभतेज सिंग भाटिया यांची अनुक्रमे बीसीसीआय सचिव आणि कोषाध्यक्षपदी बिनविरोध निवड होईल कारण निवडणूक लढवणाऱ्यांच्या अंतिम यादीत हे दोघेच उमेदवार आहेत. निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी मंगळवारी बीसीसीआयचे निवडणूक अधिकारी आणि भारताचे माजी सीईसी (मुख्य निवडणूक आयुक्त) अचल कुमार जोती यांनी तयार केली. (हे देखील वाचा: IND vs ENG T20I Series 2025: टीम इंडिया-इंग्लंडमधील टी 20 मालिका होणार धमाकेदार; हेड टू हेड रेकॉर्डची आकडेवारी घ्या जाणून)

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख 7 जानेवारी होती

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख गेल्या आठवड्यात संपली तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख मंगळवारी दुपारी 2 वाजता संपली. एकाही उमेदवाराने माघार न घेतल्याने, निवडणूक अधिकाऱ्यांनी मंगळवारी सायंकाळी 5 वाजता निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली. 12 जानेवारी रोजी होणाऱ्या एसजीएम दरम्यान निवडणुका होतील आणि त्याच दिवशी निकाल जाहीर केले जातील, ही आता औपचारिकता आहे.

सैकिया आणि भाटिया यांनी दाखल केले होते अर्ज 

1 डिसेंबर रोजी जय शाह यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून देवजित सैकिया हे बीसीसीआयचे अंतरिम सचिव म्हणून काम पाहत आहेत. भाटिया यांनी कोषाध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. महाराष्ट्र सरकारमध्ये नुकतेच कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतलेल्या आशिष शेलार यांनी हे पद रिक्त केले होते.