ICC T20 World Cup 2021: भारतातील कोरोना परिस्थिती सुधारली नाही तर UAE मध्ये होणार आयसीसी टी-20 विश्वचषक 2021- BCCI
बीसीसीआय | (Photo Credits: PTI)

सध्या देशात कोरोना विषाणू (Coronavirus) साथीने हाहाकार माजवला आहे. येत्या काही महिन्यात हा रोग भारतात नियंत्रणात आला नाही, तर यंदाचा आयसीसी टी-20 वर्ल्ड कप 2021 (ICC T20 World Cup 2021) मध्ये युएईमध्ये आयोजित होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयने (BCCI) याबाबत माहिती दिली आहे. यावर्षी टी-20 वर्ल्ड कप 18 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर या काळात होणार आहे. परंतु ज्याप्रकारे देशात कोरोनाची प्रकरणे झपाट्याने वाढत आहेत, अशा परिस्थितीत भारतात वर्ल्ड कप होण्याची शक्यता बरीच कमी आहे. बीसीसीआयचे सरव्यवस्थापक धीरज मल्होत्रा ​​यांनी बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट बोर्डाने देशात वर्ल्ड कप आयोजित करण्याची आशा सोडली नाही.

ते पुढे म्हणाले की, या स्पर्धेचा डायरेक्टर म्हणून माझी नुकतीच निवड झाली आहे. म्हणूनच माझा हा प्रयत्न असेल की देशातच वर्ल्ड कप आयोजित केला जावा. परंतु आम्हाला सामान्य आणि वाईट अशा दोन्ही परिस्थिती लक्षात घेणे आवश्यक आहे. याच आधारावर आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेशी बोलणार आहोत. सध्या तरी आमचा प्रयत्न हाच असेल की यूएईला फक्त एक बॅकअप स्थळ म्हणून लक्षात ठेवून तयारी करणे. परंतु याबाबत अंतिम निर्णय बीसीसीआय घेईल. गेल्या वर्षी कोरोनामुळे बीसीसीआयने यूएईमध्ये इंडियन प्रीमियर लीग आयोजित केली होती. (हेही वाचा: 'Mission Oxygen' मध्ये Sachin Tendulkar ची 1 कोटीची मदत; इतरांनाही भारताच्या कोविड 19 विरूद्धच्या लढाईत पुढे येण्याचं आवाहन)

सध्या भारतामध्ये कोरोना व्हायरसची दुसरी लाट पसरली आहे. गेल्या काही दिवसांपासून देशात दररोज तीन लाखाहूनही अधिक कोरोनाची प्रकरणे समोर येत आहेत. अनेक माजी क्रिकेटर्स आणि चाहत्यांच्या टीकेनंतरही बीसीसीआयने भारतात सुरू असलेल्या इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या सत्राचे आयोजन करणे सुरूच ठेवले आहे. मात्र पुढे आठ संघांच्या आयपीएलच्या तुलनेत 16 संघांची मोठी विश्वचषक स्पर्धा आयोजित करणे अत्यंत अवघड असणार आहे, म्हणूनच बीसीसीआय युएईचा पर्याय निवडू शकते.