Pratika Rawal Injured (Photo Credit - X)

Women's World Cup 2025: आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ च्या सेमीफायनलमध्ये भारतीय महिला क्रिकेट संघाने आपले स्थान आधीच निश्चित केले आहे. लीग स्टेजमधील आपला शेवटचा सामना टीम इंडियाने बांगलादेश महिला संघाविरुद्ध नवी मुंबईच्या मैदानावर खेळला. पावसामुळे २७ षटकांपर्यंत मर्यादित असलेल्या या सामन्यात बांगलादेशचा संघ ११९ धावा करू शकला. मात्र, या सामन्यात क्षेत्ररक्षण करत असताना भारताची सलामीची फलंदाज गंभीर जखमी झाली आणि तिला तातडीने मैदानाबाहेर घेऊन जावे लागले. सेमीफायनलसारख्या महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी प्रतिकाला झालेली ही दुखापत टीम इंडियासाठी मोठी चिंतेची बाब ठरण्याची शक्यता आहे.

घोट्याला आणि गुडघ्याला दुखापत

बांगलादेशच्या डावातील २१व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर शर्मीन अख्तेरने मिड-विकेटच्या दिशेने शॉट मारला. तिथे क्षेत्ररक्षण करत असलेल्या प्रतिका रावलने चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला, पण याच प्रयत्नात ती जखमी झाली आणि चेंडू सीमारेषेबाहेर गेला.

बीसीसीआयच्या मेडिकल टीमने प्रतिका रावलच्या दुखापतीबाबत माहिती दिली आहे. तिच्या घोट्याला (ankle) आणि गुडघ्याला (knee) दुखापत झाली असून, ती सध्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली आहे. दुखापत झाल्यावर प्रतिका प्रचंड वेदनेत होती. तिला सुरुवातीला स्ट्रेचरने बाहेर नेले जाईल असे वाटत होते, पण नंतर सपोर्ट स्टाफच्या मदतीने ती मैदानाबाहेर गेली.

प्रतिकाचा शानदार फॉर्म

महिला वनडे वर्ल्ड कप २०२५ मध्ये प्रतिका रावलने बॅटने शानदार फॉर्म दाखवला आहे. तिने ६ डावांमध्ये फलंदाजी करताना ५१.३३ च्या सरासरीने ३०८ धावा केल्या आहेत. त्यामुळे, ३० ऑक्टोबर रोजी ऑस्ट्रेलिया महिला संघाविरुद्ध होणाऱ्या सेमीफायनलच्या सामन्यातून प्रतिका रावल बाहेर झाल्यास, तो टीम इंडियासाठी मोठा धक्का असेल. कारण प्रतिका आणि स्मृती मंधाना यांची सलामीची जोडी मागील काही सामन्यांपासून संघाला चांगली सुरुवात करून देत आहे.