IND vs AUS T20 Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका नुकतीच (२५ ऑक्टोबर) संपली. यजमान ऑस्ट्रेलियाने २-१ ने मालिका जिंकली असली, तरी शेवटच्या सामन्यात भारताने ९ विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. आता दोन्ही संघांमधील पाच सामन्यांची टी-२० मालिका सुरू होणार आहे. आशिया कप २०२५ जिंकल्यानंतर भारतीय संघ प्रथमच मैदानात उतरणार आहे. या टी-२० मालिकेमध्ये भारताचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करेल, तर ऑस्ट्रेलियाचे कर्णधारपद मिशेल मार्श सांभाळतील. (हे देखील वाचा: Happy Birthday Irfan Pathan: 'ऑल-राऊंडर एक्स्प्रेस' इरफान पठाणचा आज वाढदिवस; BCCI ने दिल्या खास शुभेच्छा!)
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिका वेळापत्रक
पाच सामन्यांची ही मालिका २९ ऑक्टोबर ते ८ नोव्हेंबर या कालावधीत ऑस्ट्रेलियातील पाच वेगवेगळ्या ठिकाणी खेळवली जाईल. मालिकेतील सर्व सामने भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी १:४५ वाजता सुरू होतील.
| सामना क्रमांक | तारीख | ठिकाण | वेळ (IST) |
| पहिला टी-२० | २९ ऑक्टोबर | कॅनबेरा | दुपारी १:४५ |
| दुसरा टी-२० | ३१ ऑक्टोबर | मेलबर्न | दुपारी १:४५ |
| तिसरा टी-२० | २ नोव्हेंबर | होबार्ट | दुपारी १:४५ |
| चौथा टी-२० | ६ नोव्हेंबर | गोल्ड कोस्ट | दुपारी १:४५ |
| पाचवा टी-२० | ८ नोव्हेंबर | ब्रिस्बेन | दुपारी १:४५ |
तुम्ही लाईव्ह कुठे पाहू शकता?
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. त्यामुळे तुम्ही सर्व सामने स्टार स्पोर्ट्स (Star Sports) टीव्ही चॅनलवर आणि जिओ हॉटस्टार (Jio Hotstar) ॲपवर डिजिटल पद्धतीने पाहू शकता.
टी-२० मालिकेसाठी दोन्ही संघ
भारत: सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, शुभमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, नितीश कुमार रेड्डी, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा, वरुण चक्रवर्ती, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, हर्षित राणा, संजू सॅमसन, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया: मिशेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट (१-३ सामने), झेवियर बार्टलेट, महली बियर्डमन (३-५ सामने), टिम डेव्हिड, बेन द्वारशिस (४-५ सामने), नॅथन एलिस, जोश हेझलवूड (१-२ सामने), ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल (३-५ सामने), मिशेल ओवेन, जोश फिलिप, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस, अॅडम झांपा.