कोरोना व्हायरस हा बॅक्टेरिया असून Aspirin गोळी घेतल्याने त्यावर उपचार होतो? PIB Fact Check ने केला या व्हायरल मेसेजचा खुलासा
Representational Image (Photo Credits: File Image)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटात अनेक फेक न्यूज (Fake News) आणि मेसेजेस सोशल मीडियावर पसरत आहेत. कोरोना व्हायरस संबंधित अनेक चुकीची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे समोर येणाऱ्या माहितीची पडताळणी न करता ती फॉरवर्ड केली जात आहे. असाच एक मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात कोरोना व्हायरस हा बॅक्टेरिया असून एस्पिरिन (Aspirin) गोळी घेऊन त्यावर उपाय होऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. (Fact Check: सॅनिटायझरमुळे कॅन्सर होतो? COVID-19 Pandemic मध्ये व्हायरल होणाऱ्या या मेसेज मागील सत्य काय?)

या व्हायरल मेसेजमागील सत्य पीआयबीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा मेसेज फेक असून त्यात कोणतेही तथ्य नाही. कोरोना व्हायरस हा बॅक्टेरीया नसून व्हायरस आहे आणि त्यावर कोणतेही ठोस औषधं उपलब्ध नाही. असे PIB Fact Check ने ट्विटच्या माध्यमातून सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, कोविड-19 वर अद्याप कोणतेही औषध उपलब्ध नाही. दरम्यान यापूर्वी अनेक अफवा, फेक न्यूज याची पडताळणी करुन पीआयबी फॅक्ट चेकने लोकांसमोर सत्य मांडले आहे.

फेक व्हिडिओ मेसेजमध्ये करण्यात आलेला दावा: कोविड-19 हा बॅक्टेरिया आहे आणि त्यावर aspirin घेऊन उपचार होऊ शकतो.

PIB Fact Check चे स्पष्टीकरण: हा मेसेज फेक असून कोरोना व्हायरस हा व्हायरस आहे. यावर कोणतेही ठोस औषधं अद्याप उपलब्ध नाही.

PIB Fact Check:

चीनच्या वुहान शहरात उगम पावलेल्या कोरोना व्हायरसचा प्रसार संपूर्ण जगभरात झाला आहे. अमेरिका, ब्राझील, स्पेन, इटली, युके, भारत यांसारख्या अनेक देशांमध्ये शिरकाव करत कोविड-19 च्या संसर्गाने दहशत निर्माण केली आहे. कोरोना व्हायरसचा संसर्ग जगभरातील 65 लाखांहून अधिक लोकांना झाला असून 3 लाखाहून अधिक कोविड-19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान भारतात कोरोना बाधितांचा आकडा 2 लाखांच्या पुढे गेला असून 6 हजारहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे.