जगातील सर्व शास्त्रज्ञ, डॉक्टर आणि तज्ज्ञ कोरोनाचा नवीन प्रकार ओमायक्रॉनमुळे (Omicron) चिंतेत आहेत. याबाबत अद्याप कोणालाच स्पष्ट माहिती मिळालेली नाही. दक्षिण आफ्रिकेतून बाहेर पडलेल्या ओमायक्रॉनने आतापर्यंत भारतासह 77 देशांमध्ये शिरकाव केला आहे, कारण तो 70 पट वेगाने पसरत आहे. याबाबत शास्त्रज्ञ चिंतेत आहेत आणि ही जगासाठी मोठी धोक्याची घंटा असू शकते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संशोधकांच्या मते ओमायक्रॉन डेल्टा प्रकारापेक्षा 70 पट वेगाने पसरत आहे.
म्हणजेच हा व्हेरिएंट फार कमी वेळेत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संक्रमित करत आहे. वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, हा अभ्यास हाँगकाँग विद्यापीठाच्या संशोधकांनी केला आहे. या अभ्यासानुसार, कोरोनाचा नवीन प्रकार मानवाच्या श्वसनसंस्थेवर परिणाम करतो. हा व्हेरिएंट ब्रॉन्कसवर हल्ला करतो (हा एक मार्ग किंवा वायुमार्ग आहे ज्याद्वारे हवा फुफ्फुसात पोहोचते). अहवालात असेही म्हटले आहे की, मानवांमध्ये रोगाची तीव्रता केवळ विषाणूच्या प्रतिकृतीद्वारेच नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या रोगप्रतिकारक प्रतिक्रियेद्वारे देखील निर्धारित केली जाते.
हाँगकाँग विद्यापीठातील सहयोगी प्राध्यापक मायकेल चॅन ची-वाई यांनी त्यांच्या टीमसोबत हा अभ्यास केला आहे. त्यांनी ओमायक्रॉन व्हेरिएंट वेगळे गेला आहे आणि त्याची मूळ स्ट्रेन आणि डेल्टा व्हेरियंटशी तुलना केली आहे. टीमला आढळले की ओमायक्रॉन विषाणू मूळ स्ट्रेन आणि डेल्टा पेक्षा अधिक वेगाने पसरत आहे. अभ्यासात असेही म्हटले आहे की, ओमायक्रॉनमुळे फुफ्फुसाचा संसर्ग होण्याची शक्यता कोरोनाच्या मूळ स्ट्रेनपेक्षा कमी आहे. याचा अर्थ या व्हेरिएंटची अधिक प्रकरणे समोर येऊ शकतात, परंतु त्यात गंभीर प्रकरणे कमी असतील. (हेही वाचा: Paxlovid, Pfizer ची कोविड 19 अॅन्टीवायरल गोळी 89% प्रभावी; Omicron Variant च्या संसर्गालाही रोखण्यास सक्षम)
अभ्यासात आढळून आले आहे की, संसर्गानंतर 24 तासांनंतर, ओमायक्रॉन मूळ स्ट्रेन आणि डेल्टा प्रकारापेक्षा 70 पट वेगाने स्वतःची कॉपी तयार करतो. परंतु त्याचा प्रभाव 10 पटीने कमी आहे, त्यामुळे गंभीर लक्षणे उद्भवण्याची शक्यता कमी आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. भारताबद्दल बोलायचे झाले तर, आतापर्यंत या व्हेरिएंटचे एकूण 78 प्रकरणे समोर आली आहेत व हा प्रकार देशातील 11 राज्यांमध्ये पसरला आहे.