World Poha Day 2020: 'जागतिक पोहे दिन'निमित्त जाणून घ्या पोहे खाण्याचे आरोग्यदायी फायदे
Kanda Poha (Photo Credits-Facebook)

World Poha Day 2020: 7 जून हा दिवस जागतिक पोहे दिन (World Poha Day) म्हणून साजरा केला जातो. पोह्यांचा नाश्ता माहित नाही असं एकही कुटुंब सापडणार नाही. प्रत्येक प्रदेशानुसार, पोहे करण्याची पद्धती आणि चव बदलते. पोह्याचा नाश्ता चविस्ट तसेच आरोग्यदायीदेखील आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात पोह्याच्या नाश्त्याला पंसती आहे. जे लोक डायटिंग करतात. त्यांच्यासाठी पोह्यांचा नाश्ता (Poha is a Healthy Breakfast) अत्यंत आरोग्यदायी समजला जातो.

महाराष्ट्र, ओडिसा, मध्य प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात आणि राज्यस्थानमध्ये पोह्याचा नाश्ता प्रसिद्ध आहे. भारतात पोह्याचा शोध नेमका कुठे लागला हे कोणाला माहिती नाही. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, पोह्यात 76.9 टक्के कार्बोहाड्रेटस आणि 23.1 टक्के प्रोटीन असते. वजन कमी करण्यासाठी पोहे फायदेशीर मानले जातात. आज या लेखात जागतिक पोहे दिनानिमित्त पोहे खाण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घेऊयात. (हेही वाचा - World No Tobacco Day 2020: 'जागतिक तंबाखू विरोधी दिन' निमित्त जाणून घ्या तंबाखूचे व्यसन सोडण्यासाठी 'हे' घरगुती उपाय)

पोह्याचे आरोग्यदायी फायदे -

कार्बोहाड्रेटस चा उत्तम स्त्रोत -

पोह्यात 76.9 टक्के कार्बोहाड्रेटस असतात. तसेच पोह्यात 23 टक्के फॅट्स असतात. कार्बोहाड्रेटसमुळे शरीराला ऊर्जा मिळते. त्यामुळे सकाळी पोह्याचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो.

शरीराला लोहाचा पुरवठा होता -

पोह्यात लोहाचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. पोहे तयार करण्याच्या प्रक्रियेत तांदळावरून लोखंडी रूळ फिरवले जातात. या प्रक्रियेत लोह्याचा अंश पोह्यात शिरतो. त्यामुळे यात लोहाचे प्रमाण अधिक असते.

रक्तातील साखरेवर नियंत्रण -

मधुमेहाच्या रुग्णांसाठी पोह्यांचा नाश्ता आरोग्यदायी मानला जातो. पोह्यात फायबरचे प्रमाण अधिक असते. पोह्याच्या सेवनाने रक्तातील साखर नियंत्रित होण्यास मदत होते.

पचनास हलके -

पोह्यांचा नाश्ता पचनास हलका असतो. त्यामुळे सकाळच्या नाश्त्यात त्याचा समावेश केला जातो. पोह्यामुळे पोट भरलेले राहते आणि खूप कमी लागते.

लठ्ठपणा येत नाही -

पोहे खाल्ल्याने लठ्ठपणा वाढत नाही. एक वाटी पोह्यामध्ये कमीत कमी 250 कॅलरीज असतात. तसेच पोह्यांमध्ये व्हिटामिन, मिनरल आणि अँटी ऑक्सिडंट असतात.