Easter Sunday 2024: ईस्टर संडे का साजरा केला जातो? इतिहास आणि महत्त्व जाणून घ्या
Easter Sunday 2024 (PC - File Image)

Easter Sunday 2024: ख्रिश्चन धर्मातील प्रमुख सणांपैकी एक असणारा सण म्हणजे इस्टर (Easter 2024). हा दिवस खूप आनंदाचा आहे. गुड फ्रायडे (Good Friday) नंतर रविवारी इस्टर साजरा केला जातो. गुड फ्रायडे हा येशू ख्रिस्ताच्या त्याग आणि बलिदानाशी संबंधित दिवस आहे, तर इस्टर हा आनंदाचा दिवस आहे. त्यामुळे या दिवसाला हॅपी ईस्टर असेही म्हणतात. ख्रिश्चन धर्माचे लोक ईस्टर मोठ्या उत्साहात साजरे करतात.

इस्टरच्या निमित्ताने लोक चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करतात. तसेच एकमेकांना शुभेच्छा देतात. ईस्टर एका खास पद्धतीने साजरा केला जातो. या दिवशी लोक वेगवेगळ्या प्रकारची अंडी सजवतात आणि अंडी एकमेकांना भेट म्हणून देतात. या लेखाद्वारे, इस्टर 2024 कधी साजरा केला जात आहे, हा सण साजरा करण्याचे कारण किंवा लोकप्रिय कथा काय आहे, तसेच इस्टरवर अंडी भेट देण्याचे महत्त्व जाणून घेऊयात.

इस्टर संडे कधी आहे?

इस्टर रविवारी साजरा केला जातो. या कारणास्तव याला इस्टर संडे असेही म्हणतात. गुड फ्रायडे नंतर तिसऱ्या दिवशी रविवारी इस्टर संडे साजरा केला जातो. यावेळी गुड फ्रायडे 29 मार्च रोजी साजरा करण्यात आला आणि इस्टर 31 मार्च रोजी साजरा केला जात आहे.

गुड फ्रायडे का साजरा करतात?

प्रभु येशू हे प्रेम आणि शांतीचे दूत होते. ते जगाला करुणा आणि प्रेमाचा संदेश देत असतं. परंतु रोमन राज्यकर्ते आणि काही धार्मिक कट्टरतावाद्यांना हे आवडले नाही. या कारणास्तव, शारीरिक छळ केल्यानंतर येशूला वधस्तंभावर खिळण्यात आले. त्यांचा मृत्यू झाला तो दिवस गुड फ्रायडे म्हणून साजरा केला जाऊ लागला. तीन दिवसांनंतर इस्टर साजरा करण्याचे एक विशेष कारण आहे.

इस्टर संडे का साजरा करतात ?

जेव्हा येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळले गेले तेव्हा त्याचे अनुयायी खूप निराश झाले. पण तीन दिवसांनंतर, रविवारी, येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान झाले. त्यांच्या पुनरुज्जीवनामुळे अनुयायांमध्ये आनंदाची लाट उसळली होती. त्यामुळे इस्टर हा आनंदाचा सण म्हणून साजरा केला जातो. ख्रिश्चन धर्मग्रंथानुसार, पुनरुत्थान झाल्यानंतर म्हणजेच इस्टर संडेनंतर, येशू ख्रिस्त पृथ्वीवर 40 दिवस राहिले. या वेळी त्यांनी आपल्या शिष्यांना प्रेम आणि करुणेचे धडे शिकवले, त्यानंतर ते स्वर्गात गेले.

इस्टरमध्ये अंड्यांचे महत्त्व -

काही लोक इस्टरच्या निमित्ताने वेगवेगळ्या प्रकारची अंडी सजवतात आणि एकमेकांना भेट देतात. इस्टरमध्ये अंड्याला विशेष महत्त्व असते. वास्तविक, ख्रिश्चन धर्माचे लोक अंड्याला नवीन जीवन आणि उत्साहाचे प्रतीक मानतात, म्हणून एकमेकांना अंडी भेट म्हणून देऊन हा सण उत्साहात साजरा करतात.