
Good Friday 2025 HD Images in Marathi: येशू ख्रिस्त यांनी मानवजातीला पापांमधून मुक्ती देण्यासाठी दिलेल्या बलिदानाचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे ‘गुड फ्रायडे’ (Good Friday 2025). आज, 18 एप्रिल रोजी गुड फ्रायडे असून, हा दिवस दरवर्षी ईस्टर संडेच्या आधीच्या शुक्रवारी, संपूर्ण जगभरातील ख्रिश्चन समुदाय अत्यंत श्रद्धा, नम्रता आणि संयमाने पाळतात. गुड फ्रायडे या शब्दामध्ये ‘गुड’ हा शब्द असला तरी, हा दिवस ईसाई समुदायासाठी शोक, प्रार्थना आणि आत्मचिंतनाचा दिवस आहे, जो त्यांना येशूच्या शिकवणींवर चालण्याची प्रेरणा देतो. कारण या दिवशी, येशू ख्रिस्त यांना अन्यायाने दोषी ठरवून क्रॉसवर खिळले गेले होते. त्यांनी कोणताही अपराध न करता मानवतेसाठी अपार वेदना सहन केल्या आणि आपल्या जीवनाचे बलिदान दिले.
त्यांच्या मृत्यूमुळे मानवाला पापांतून मुक्ती मिळाली, असा ख्रिश्चन धर्माचा विश्वास आहे. गुड फ्रायडे या दिवशी चर्चमध्ये विशेष प्रार्थना सभा आयोजित केल्या जातात. येशूच्या शेवटच्या क्षणांची आठवण म्हणून मौन पाळले जाते, शोक व्यक्त केला जातो आणि काही ठिकाणी उपवासही केला जातो. चर्चमध्ये येशूच्या क्रूसवधाची नाट्यरूप मांडणी केली जाते, जी भक्तांच्या मनात त्यांचे बलिदान अधिक खोलवर रुजवते. (हेही वाचा: Good Friday 2025 Messages: गुड फ्रायडे निमित्त WhatsApp Status, Images, Photos द्वारे संदेश पाठवून स्मरण करा प्रभू येशूच्या बलिदानाचे)
तर अशा या आपल्या जीवनातील मूल्यांचे पुनर्मूल्यांकन करण्याची आणि समाजात सकारात्मक बदल घडवण्याची संधी देणाऱ्या दिवशी, खास WhatsApp Status, Messages, Images द्वारे द्या प्रेम आणि शांतीचा संदेश.





दरम्यान, ख्रिश्चन धर्मग्रंथांनुसार, येशू ख्रिस्ताचा त्यांच्याच शिष्यांपैकी एक, जूडसने 30 नाण्यांसाठी विश्वासघात केला. गेथ्समनी बागेत रात्रीच्या वेळी येशूला रोमन सैनिकांनी अटक केली. त्यांच्यावर खोटे आरोप ठेवून त्यांना रोमन गव्हर्नर पॉन्शियस पायलटने क्रूसावर चढवण्याची शिक्षा सुनावली. त्यानंतर येशूंना कॅल्व्हरी टेकडीवर खिळे ठोकून क्रूसावर लटकवण्यात आले. दुपारी 12 ते 3 या वेळेत येशूंचा मृत्यू झाला. येशू ख्रिस्त यांच्या गुड फ्रायडेच्या क्रूसावरील मृत्यूनंतर तिसऱ्या दिवशी इस्टर संडे साजरा केला जातो. याच दिवशी येशू पुन्हा जिवंत झाल्याचे मानले जाते.
गुड फ्रायडे केवळ दुःख व्यक्त करण्याचा नाही, तर त्यातून उगम पावणाऱ्या आशेचा आणि पुनरुत्थानाच्या विश्वासाचाही दिवस आहे. हा दिवस आपल्याला आपल्या चुका सुधारण्याची, इतरांना मदत करण्याची आणि समाजात शांती निर्माण करण्याची संधी देतो. विशेषतः भारतासारख्या बहुसांस्कृतिक देशात, गुड फ्रायडेचा संदेश सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र आणतो, कारण प्रेम आणि क्षमा ही सार्वत्रिक मूल्ये आहेत.