Coronavirus Vaccine Trial In KEM Hospital: कोरोना विषाणूवरील लसीच्या मानवी चाचणीला पुण्यानंतर आता मुंबईतील पालिकेच्या केईएम रुग्णालयात (KEM Hospital) सुरुवात झाली आहे. शनिवारी 3 स्वयंसेवकांना सिरम इन्स्टिट्यूटने (Serum Institute Of India) बनवलेली 'कोव्हीशिल्ड' ही लस (Covishield Vaccination) देण्यात आली असल्याचं केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी सांगितलं. रविवारी आणखी 10 स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली. पुढील महिनाभरात राज्यात सुमारे 100 स्वयंसेवकांवर तसेच भारतात विविध रुग्णालयातून 1600 स्वयंसेवकांवर या लशीचा प्रयोग करण्यात येणार आहे.
'कोव्हीशिल्ड' लस यशस्वी ठरली तर कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आटोक्यात आणणं शक्य होणार आहे. मात्र, जर कोव्हीशिल्ड लस चाचणी दरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांचा विमा नुकसान भरपाईच्या माध्यमातून मिळणार आहे. केंद्र सरकारच्या या मदतीमुळे स्वयंसेवकांना मोठा दिलासा मिळाला आहे. (हेही वााचा - COVID-19 Vaccine Update: Johnson & Johnson कंपनीच्या कोविड-19 वरील संभाव्य लसीचे सुरुवातीच्या टप्प्यातील परिणाम सकारात्मक)
दरम्यान, कोव्हीशिल्ड लस चाचणीसाठी केईएम रुग्णालयात आतापर्यंत 375 स्वयंसेवकांची नोंद झाली आहे. मात्र, यातील ज्यांची प्रकृती ठणठणीत आहे, अशा 100 स्वयंसेवकांची निवड करण्यात आली आहे. शनिवारी तीन स्वयंसेवकांना लस देण्यात आली. सध्या या स्वयंसेवकांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. मात्र, कोणताही त्रास होत नसल्याने या तिघांना घरी पाठवण्यात आले. आणखी महिनाभराने या तिघांना पुन्हा एकदा लस देण्यात येणार आहे. केईएम रुग्णालयाशिवाय नायरमध्ये रुग्णालयामध्येदेखील सोमवारपासून कोरोना लसीची मानवी चाचणी केली जाणार आहे. (हेही वाचा - COVID-19 Vaccine Update: पुढच्या एका वर्षात कोरोना लसीवर खर्च करण्यासाठी सरकारकडे 80 हजार कोटी रुपये आहेत का? अदर पूनावाला यांचा सवाल)
कोरोना लसीची मानवी चाचणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर स्वयंसेवक पुढे येत आहेत. मात्र, कोरोना चाचणी करताना एखाद्या स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यास किंवा संबंधित स्वयंसेवक आजारी पडल्यास त्याला विमा संरक्षण देण्यात यावं, या मागणीसाठी एथिक्स समितीने काही मुद्दे मांडले होते. त्यानुसार, समितीने मांडलेल्या सर्व मुद्द्यांचे निराकरण करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना लस चाचणी दरम्यान स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची भरपाई विम्याच्या माध्यमातून मिळणार आहे. याशिवाय स्वयंसेवक चाचणी दरम्याना आजारी पडल्यास 38 लाख ते 50 लाख रुपयांपर्यंतचे विमा संरक्षण मिळणार आहे.