COVID-19 Vaccine Update: पुढच्या एका वर्षात कोरोना लसीवर खर्च करण्यासाठी सरकारकडे 80 हजार कोटी रुपये आहेत का? अदर पूनावाला यांचा सवाल
Adar Poonawalla (PC - PTI)

COVID-19 Vaccine Update: पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (Serum Institute of India- SII) चे सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawalla) यांनी शनिवारी आपल्या टि्वटर हँडलवरुन केंद्र सरकारला प्रश्न विचारला आहे. या पोस्टमध्ये अदर यांनी म्हटलं आहे की, 'पुढच्या एका वर्षात कोरोना लसीवर खर्च करण्यासाठी केंद्र सरकारकडे 80 हजार कोटी रुपये आहेत का? हे देशापुढील आणखी एक आव्हान आहे, जे आपल्याला स्विकारावं लागणार आहे.' अदर पूनावाला यांनी आपल्या पोस्टमध्ये पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आणि आरोग्य मंत्रालयाला टॅग केलं आहे. पूनावाला यांनी हा प्रश्न उपस्थित करून केंद्र सरकारकडे लस खरेदी करण्यासाठी आणि त्याचे वितरण करण्यासाठी पुरेसे आर्थिक साहाय्य आहे की, नाही हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे. याशिवाय भारताची गरज लक्षात घेता, लशीची खरेदी आणि वितरणासंदर्भात देशातील व परदेशातील लस उत्पादकांना मार्गदर्शन करावे लागेल, असंही पूनावाला यांनी म्हटलं आहे. (हेही वाचा  - Coronavirus Vaccine: कोरोनावरील लस येण्यापूर्वी जगभरातील मृतांचा आकडा 20 लाखांपर्यंत पोहचण्याची शक्यता-WHO)

अदर पूनावाला यांनी दावा केला आहे की, भारतातील सर्व नागरिकांना कोरोना विषाणूची लस देण्यासाठी अंदाजे 80 हजार कोटी रुपये लागतील. सध्या भारतासह जगभरात ऑक्सफर्डने विकसित केलेल्या लशीच्या तिसऱ्या टप्प्याची चाचणी सुरु आहे. यापूर्वी फायनान्शियल टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत पूनावाला यांनी सांगितलं होतं की, जगातील प्रत्येकापर्यंत ही लस पोहोचण्यासाठी कमीत कमी 4 वर्षे लागतील. गोवर किंवा रोटा विषाणूसारख्या आजाराप्रणानेचं कोरोना विषाणूवर दोन डोसांची आवश्यकता असेल. त्यामुळे संपूर्ण जगासाठी 15 अब्ज डोसची व्यवस्था करावी लागेल.

दरम्यान, ऑक्सफर्ड विद्यापीठाची प्रयोगशाळा, पुण्याची सीरम कंपनी आणि अॅस्ट्राझेंका (Astrazeneca) संयुक्तपणे कोरोनावर मात करण्यासाठी लशीची निर्मिती करत आहेत. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सध्या पुण्यात सुरू आहेत. पुण्यातील ससून रुग्णालयातील काही निवडक व्यक्तींना या लसीचा डोस देण्यात आला आहे. या व्यक्तींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर 2021 मध्ये कोरोनाची लस बाजारात येण्याची शक्यता आहे.