ग्लोबल हेल्थकेअर कंपनी जॉन्सन अँड जॉन्सन (Johnson & Johnson) च्या कोविड-19 (Covid-19) वरील लसीच्या सुरुवातीच्या ट्रायल्सचे परिणाम सकारात्मक असल्याचे समोर आले आहे. लसीच्या सुरुवातीच्या आणि मधल्या टप्प्यातील क्लिनिकल ट्रायल्सचे (Clinical Trials) निकाल शुक्रवारी (25 सप्टेंबर) हाती आले आहेत. त्यातून असे दिसून आले की, जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीची लस कोरोना व्हायरस विरुद्ध चांगली रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते. Ad26.COV2.S असे या लसीचे नाव आहे. ही लस अमेरिकेतील सुमारे 1000 निरोगी प्रोढांना देण्यात आली होती.
कोविड-19 विरुद्धची ही संभाव्य लसीचा 5x1010 vp डोस देण्यात आला आहे. मात्र याच्या एका डोसातच कोरोना व्हायरसपासून सुरक्षा मिळत असून रोगप्रतिकारकशक्ती वाढत असल्याचे अहवालातून समोर आले आहे. Ad26.COV2.S च्या एकाच डोसमुळे लस दिलेल्यांपैकी बहुतांश स्वयंसेवकांमध्ये चांगला परिणाम दिसून आला.
आतापर्यंत हाती आलेल्या अहवालानुसार, लसीचा परिणाम जाणून घेण्यासाठी अधिक अभ्यासाची गरज आहे, असे हार्वर्ड टी.एच. चान स्कूल ऑफ पब्लिक हेल्थचे प्राध्यापक डॉ बॅरी ब्लूम यांनी सांगितले. डॉ. बॅरी ब्लूम यांना जॉनसन अँड जॉनसन कंपनीच्या लसीच्या ट्रायल्समध्ये सहभागी करण्यात आले नव्हते. सुरुवातीच्या अहवालानुसार,कंपनीने लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरु केली आहे. या चाचणीमध्ये 60 हजार लोक सहभागी होणार असून या वर्षाखरेपर्यंत या चाचण्या पूर्ण होण्याची शक्यता आहे.
जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनीची कोरोना व्हायरस वरील लसीची वैद्यकीय चाचणी शेवटच्या टप्प्यात पोहचली असल्याची माहिती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वीच दिली होती. क्लिनिकल ट्रायल्सच्या चौथ्या टप्प्यात पोहचलेली अमेरिकेतील ही चौथी लस आहे.
दरम्यान, जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या लेटेस्ट अपडेटनुसार, जगात सध्या एकूण 32,471,119 लोक कोरोनाग्रस्त आहेत. तर 987,000 रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत अमेरिका प्रथमस्थानी आहे. अमेरिकेतील कोरोना बाधितांची संख्या 7,032,524 असून 203,657 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानी असून देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 59,03,933 वर पोहचला आहे. तर आतापर्यंत 93,379 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.