Coronavirus: भारतातील 170 जिल्हे हॉटस्पॉट म्हणून घोषित; तीन विभागांत जिल्ह्यांची विभागणी
Coronavirus in India (Photo Credits: IANS)

कोरोना विषाणू (Coronavirus) आणि लॉकडाऊनच्या परिस्थितीबाबत बुधवारी आरोग्य व गृह मंत्रालयाची संयुक्त पत्रकार परिषद झाली. या प्रसंगी आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी देशातील जिल्हे तीन विभागांमध्ये विभागले असल्याचे सांगितले. ते म्हणाले, देशात हॉटस्पॉट जिल्हे (कोरोना व्हायरसची जास्त प्रकरणे), नॉन-हॉटस्पॉट जिल्हे (जिथे प्रकरणे समोर येत आहेत) आणि ग्रीन झोन जिल्हे (जिथे कोणतेही प्रकरण समोर आले नाही) अशा विभागांमध्ये विभागले गेले आहेत. सध्या देशात 170 हॉटस्पॉट जिल्हे व हॉटस्पॉट नसलेले 207 जिल्हे घोषित केले आहेत.

लव्ह अग्रवाल पुढे म्हणाले की, कॅबिनेट सचिवांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे राज्यांचे मुख्य सचिव, डीजीपी, आरोग्य सचिव, डीएम, एसपी, महानगरपालिका आयुक्त आदींशी बैठक घेतली. हॉटस्पॉट्स आणि कोरोना प्रतिबंधक रणनीती यावर चर्चा झाली. जिल्ह्यांना कोविड समर्पित रुग्णालय, कोव्हीड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर, कोविड रुग्णालय (जिथे व्हेंटिलेटर देखील उपस्थित आहेत) तयार करण्यास सांगितले आहे. सर्व जिल्ह्यांना जिल्हा पातळीवर कोरोना विषाणूबाबत एक संकट व्यवस्थापन आराखडा तयार करण्यास सांगण्यात आले आहे. एका जिल्ह्याचे अपयश हे संपूर्ण देशाच्या अपयशाचे कारण असू शकते, म्हणूनच प्रतिबंध योजना देशभरातील प्रत्येक जिल्ह्यात लागू असणे आवश्यक आहे. (हेही वाचा: भारतातील 4 राज्यांमधील वटवाघूळांमध्ये आढळला कोरोना व्हायरस; याआधी Bat द्वारेच झाले होते निपाहचे संक्रमण)

या परिषदेमध्ये उपस्थित असलेले इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) रतन गंगाखेडकर म्हणाले की, चीनमधील संशोधनात असे आढळले आहे की, कोरोना व्हायरसची व्युत्पत्ती वटवाघूळांमुळे झाली असावी. सध्या देशात वटवाघूळाच्या दोन प्रजातींमध्ये कोरोना विषाणू आढळून आला आहे, मात्र ते मनुष्यामध्ये त्याचे संक्रमण होईल इतके सक्षम नाहीत.

20 एप्रिलनंतर काय काय सुरु होईल याबाबत बोलताना, गृह मंत्रालयाच्या सहसचिवांनी केवळ काही व्यवसाय शिथिल केल्याची माहिती दिली. यामध्ये दैनंदिन गरजा संबंधित सेवा आणि दुकाने सुरू होतील, किराणा व रेशनची दुकाने उघडली जातील, फळ-भाजीपाला, सॅनिटरी वस्तू विकणारी दुकाने, दुग्धशाळा, दुधाची केंद्रे, पोल्ट्री, मांस, मासे, इलेक्ट्रीशियन, आयटी दुरुस्ती, मोटर मेकॅनिक, सुतार, कुरिअर, डीटीएच आणि केबल सेवा इत्यादी कामे सुरू करण्यात येतील असे सांगितले. परंतु स्टोअरमध्ये सामाजिक अंतराचे अनुसरण करणे आवश्यक असणार आहे.